मुंबई : मुंबईत लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. हार्बर लाईन मार्गावर एका तरुणीवर लैंगिक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाला. बुधवारी सकाळच्या सुमारास CSMT-मसजिद रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. विद्यार्थीनी परीक्षेसाठी हार्बर मार्गावरुन बेलापूर येथे चालली होती. त्यावेळी ही घटना घडली.
गुन्हा घडला त्याचदिवशी आरोपी नवाझु करीमला (40) अटक करण्यात आली. तो हमाल म्हणून काम करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली.
लोकल डब्ब्यात सुरक्षा रक्षक कधी असतो?
रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान लोकलमधील महिलांच्या डब्ब्यात एक सुरक्षारक्षक तैनात असतो. याआधी सुद्धा मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांविरोधात गुन्हे घडले आहेत, त्यामुळे सुरक्षेसाठी महिलांच्या डब्ब्यात सुरक्षा रक्षकाची तैनाती केली जाते. पोलिसांनी आरोपी नवाझु करीमच्या विरोधात बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला आहे.
ट्रेनमध्ये काय घडलं?
पीडित मुलगी दक्षिण मुंबईमध्ये राहते. तिने सकाळी 7.27 च्या सुमारास सीएसएमटी-पनवेल लोकलमधील महिला डब्ब्यात प्रवेश केला. त्याच डब्ब्यात एक वयोवृद्ध महिला प्रवासी होती. ट्रेन सुरु होताच करीमने धावत ट्रेन पकडली. CSMT ते मसजिद या 3 ते 4 मिनिटांच्या प्रवासात त्याने विद्यार्थींनीवर लैंगिक जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
धावत जाऊन जनरलच्या डब्ब्यात चढली
त्यावेळी डब्ब्यात असलेल्या सहप्रवासी महिलेने मदतीसाठी आरडा-ओरडा केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. विद्यार्थीनीने प्रतिकार केल्यामुळे आरोपीचा डाव यशस्वी होऊ शकला नाही. मसजिद स्थानकात ट्रेन थांबताच ती ट्रेनमधून उतरली व धावत जाऊन जनरलच्या डब्ब्यात चढली.
मुलगी भेदरलेल्या अवस्थेत होती
“पीडित मुलगी भेदरलेल्या अवस्थेत होती. पुरुष प्रवाशांनी काही घडलय का? म्हणून तिच्याकडे विचारणा केली. तिला काही मदत हवीय का? त्यावेळी तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी एका प्रवाशाने रेल्वे पोलिसांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली” वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली.