सुरत : आपल्या लहानग्या मुलांकडे झालेलं दुर्लक्ष त्यांच्या जीवावर बेतू शकतं, याचं उदाहरण नुकतंच गुजरातमध्ये समोर आलं आहे. मुलांना आनंदी ठेवण्यासाठी दिवाळीत आई-वडील लेकरांना फटाके देतात. मात्र फटाके उडवताना कोणती सावधगिरी आणि काळजी बाळगायला हवी, याची माहिती देण्यास विसरले, तर मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण मिळू शकतं. सुरतमधील नवगाम येथील दिंडोलीमध्ये तीन वर्षांच्या मुलाने फटाका खाल्ला. त्यानंतर अतिसार आणि उलट्यांमुळे मुलगा गंभीर आजारी पडला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
काय आहे प्रकरण?
सुरतमध्ये राहणाऱ्या संबंधित कुटुंबातील पालकांनी आपल्या मुलासाठी फटाके आणले. काही दिवसांनी त्यांच्या घरातील तीन वर्षांचं मूल अचानक आजारी पडलं. त्याला होणाऱ्या उलट्यांची तपासणी केली तेव्हा त्यात फटाक्यांच्या आतील पदार्थाप्रमाणे काहीतरी असल्याचं पालकांना जाणवलं. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
डॉक्टरांनीही या घटनेविषयी आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे सर्व पालकांना आपल्या मुलांची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी बालकाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
बाळाने फटाके खाल्ल्याचा दावा
बालकाच्या वडिलांनी सांगितलं की ते पहिल्यांदाच मुलांसाठी फटाके घेऊन आले. मात्र त्याने फटाके कधी खाल्ले, हे आपल्याला समजलंच नाही. हे कुटुंब आठ महिन्यांपूर्वी बिहारहून सुरतला आलं होतं. पती-पत्नी, तीन वर्षांचा मोठा मुलगा आणि दोन वर्षांची धाकटी मुलगी असं त्यांचं चौकोनी कुटुंब होतं.
हेही वाचा : Diwali 2021 | फटाके फोडताना डोळ्यांची काळजी कशी घ्याल?
मुलाला उलटीचा त्रास होत असल्यामुळे वडील चिंतेत होते. त्याला डॉक्टरांकडे नेण्यात आलं, मात्र तिथे त्याला शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र हॉस्पिटलमध्ये त्याला मृत घोषित करण्यात आलं. कुटुंबीयांनी मात्र शव विच्छेदन करण्यास का-कू केली आहे.
मृत्यूचं नेमकं कारण अस्पष्ट
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार कोणीही बालकाला फटाके खाताना किंवा त्याच्या आसपास पाहिलं नाही. मात्र बालकाच्या आईने उलटीमध्ये फटाकेसदृश्य पदार्थ पाहिल्याचा दावा केला आहे. मात्र या निमित्ताने आपल्या लहान बाळांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
संबंधित बातम्या :
सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी पनवेलची महिला कॉन्स्टेबल गजाआड, वरिष्ठाच्या हत्येचा शिजणारा कटही उघड
नव्वदीच्या वृद्धासह पत्नी राहत्या घरी मृतावस्थेत, उच्चभ्रू वस्तीमध्ये दुहेरी हत्याकांडाने खळबळ
हत्तीच्या नावे कोट्यवधींची संपत्ती दान करणाऱ्या तरुणाची आठ गोळ्या झाडून हत्या