चंदिगढ : हरियाणातील बहादूरगडच्या असोदा गावात एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मयत तरुण दीपक हा सैन्यात भरतीची तयारी करत होता. दीपक आसोडाहून जाखोडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर धावण्याचा सराव करत असताना ही घटना घडली. गावातील तिघा जणांवर दीपकच्या हत्येचा आरोप आहे. 18 वर्षीय दीपक सैन्य भरतीची तयारी करत होता. तो बीएससी प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथके छापे घालत आहेत.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक शनिवारी संध्याकाळी आसोदा-जाखोडा रस्त्यावर धावत होता. यावेळी कोणीतरी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. पादचाऱ्यांना याविषयी समजल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले. यानंतर कुटुंबीयांनी त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात नेले. परंतु तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणांचा शोध सुरू केला आहे.
शव विच्छेदन अहवालाकडे लक्ष
घटनेची माहिती मिळताच आसौदा पोलीस ठाण्याचे प्रभारी जसबीर सिंह आणि असौदा चौकीचे प्रभारी राकेश कुमार घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमनेही गावात पोहोचून नमुने घेतले. सध्या मृतदेह बहादूरगड येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात पाठवण्यात आला आहे. तिथे मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये पतीकडून पत्नीची हत्या
दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील एका जोडप्यामध्ये फेसबुक चॅटिंगवरुन झालेला वाद इतका वाढला, की पतीने आपल्या पत्नीचा जीव घेतला. पतीला संशय होता की पत्नी चॅटिंगद्वारे इतर पुरुषांशी मैत्री करत आहे. यामुळे त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. अखेर वाद इतका विकोपाला गेला, की पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही खळबळजनक घटना पश्चिम बंगालमधील हुगली जिल्ह्यातील आहे.
नेमकं काय घडलं?
हुगळी जिल्ह्यातील चंदननगर पोलीस स्टेशन परिसरात पती रिंटू दासने पत्नी पल्लवी दासचा (23 वर्ष) गळा दाबून खून केला. याचं कारण म्हणजे पत्नी सतत फेसबुक चॅटिंगमध्ये बिझी असायची. आरोपी पती रिंटू दासला संशय होता, की त्याची पत्नी पल्लवी फेसबुक चॅटद्वारे इतर पुरुषांशी मैत्री करत आहे. यामुळे त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर शंका होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी श्रीरामपूर गिरवळ येथून रुग्णालयात पाठवला.
भाऊ संशयी, वहिनीला मारहाण
आरोपी रिंटू दासचा भाऊ सिंटू दास याने सांगितले की वहिनी चांगल्या स्वभावाची होती पण आपला भाऊ नेहमी तिच्यावर संशय घ्यायचा आणि नेहमी तिला मारहाण करायचा.
पोलीस तपास सुरु
आरोपीची आई माना दास यांनी सांगितले की तिची सून पल्लवी दासला फेसबुक चॅटिंगची आवड होती, त्यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत असत. या हत्येविषयी माहिती देताना चंदननगर आयुक्तालयाचे डीसीपी मुख्यालय प्रवीण प्रकाश म्हणाले की, आरोपी पती रिंटू दासला पोलिसांनी भादंविच्या कलम 302 आणि 498 ए अंतर्गत अटक केली आहे. या प्रकरणी पुढील कारवाई केली जात आहे.
संबंधित बातम्या :
वहिनीची चाकूने भोसकून हत्या, दीराला अटक
दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला