चंदिगढ : हरियाणाच्या रोहतकमधील प्रॉपर्टी डीलर प्रदीप मलिक उर्फ बबलू पहललान, त्याची पत्नी बबली, मुलगी तमन्ना उर्फ नेहा आणि सासू रोशनी यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुलगा अभिषेकच्या समलैंगिक संबंधांना कुटुंबाने विरोध केल्याने आणि सेक्स चेंज ऑपरेशनसाठी पैसे न दिल्याने त्याने चौघांची हत्या केल्याचा आरोप आहे. एकाच कुटुंबातील चौघांच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली होती.
समलिंगी संबंधांना कुटुंबाचा विरोध
पोलीस विभागातील सूत्रांनी सांगितले की, दिल्लीत केबिन-क्रूचा कोर्स करणारा अभिषेक मलिक त्याच्या एका वर्गमित्रासोबत समलैंगिक संबंधात होता. “अभिषेकच्या पालकांना त्याचे समलिंगी संबंध मान्य नव्हते. मुलाने हे रिलेशनशीप तोडावं, अशी कुटुंबाची इच्छा होती. दुसरीकडे, अभिषेक आपल्या गे पार्टनरसोबत राहण्यावर ठाम होता. त्याच्या नावाचा टॅटूही त्याने बनवून घेतला होता. त्याने लिंग बदल शस्त्रक्रियेसाठी पालकांकडे पैशांची मागणी केली होती, पण त्यांनी नकार दिला. अखेरीस, त्याने त्याचे आई -वडील, बहीण आणि आजीला गोळ्या घातल्या” असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
गे पार्टनरच्या नावाने छातीवर टॅटू
सूत्रांनी सांगितले की, अभिषेकने त्याच्या होमोसेक्शुअल जोडीदाराचे नाव आपल्या छातीवर टॅटू करुन गोंदवले आहे. रोहतकचे एसपी राहुल शर्मा यांनीही दुजोरा दिला, की आरोपी दुसर्या मुलासोबत संबंधात होता. अभिषेक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांमधील वादाचे हेच मुख्य कारण होते. “आमच्या तपासानुसार, हे खुनामागील संभाव्य कारण आहे” असे ते म्हणाले. अभिषेकचा साथीदार खून होण्यापूर्वी त्याला भेटण्यासाठी रोहतकला आला होता. तो एका हॉटेलमध्ये थांबला होता, जिथे अभिषेक त्याला हत्येच्या आधी आणि हत्येनंतरही भेटला होता.
कशा घडल्या हत्या
27 ऑगस्ट रोजी मलिक कुटुंबात हे हत्याकांड घडले. सुरुवातीला अभिषेकने झोपलेल्या बहिणीची तिच्या खोलीत जाऊन गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर आजीला हाक मारुन तिच्यावरही दोन गोळ्या झाडल्या. त्या मागोमाग आजी बोलवत आहे, असं आईला खोटं सांगून खोलीत बोलवलं. आईने आजीचा मृतदेह पाहताक्षणीच त्याने तिला गोळी घातली. अखेरीस खालच्या मजल्यावर जाऊन वडिलांनाही त्याने गोळी घालून संपवलं अभिषेकला 31 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले आणि पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “क्राईम सीन पुन्हा तयार करण्यात आले आहे आणि हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” सूत्रांनी सांगितले की अभिषेकच्या वडिलांकडे पिस्तूल होते, जे खुनासाठी वापरले गेलेले हत्यार असण्याची शक्यता आहे. “त्याच्या पालकांना गोळ्या घातल्यानंतर अभिषेक हॉटेलमध्ये त्याच्या मित्राला भेटायला गेला. मग तो घरी परतला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून आश्चर्यचकित झाल्याचा अभिनय त्याने केला”
संबंधित बातम्या :
आई-वडील, बहीण, आजी, कुणालाच सोडलं नाही, तरुणाने सगळ्यांना संपवलं, कारण ऐकून पोलीसही चक्रावले
बेलफुल वाटणाऱ्या आजी अचानक बेपत्ता, दोन दिवसांनी ऊसाच्या शेतात मृतदेह, यवतमाळमध्ये खळबळ