मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग (Param Bir Singh) यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. सचिन वाझे (Sachin Vaze) यांची पुनर्नियुक्ती परमवीर सिंग यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्तांनी गृह खात्याला पाठवलेला अहवाल ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागला आहे. (Hemant Nagrale sends Report to Home Ministry on Param Bir Singh Sachin Vaze Case)
विरोधानंतरही परमबीर सिंगांकडून वाझेंची नियुक्ती
तत्कालीन पोलीस सह आयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या नियुक्तीला विरोध असतानाही परमवीर सिंग यांनी त्यांची नियुक्ती केली, असा खुलासा अहवालात करण्यात आला आहे. वाझे सर्वसाधारण पोलीस निरीक्षक असतानाही ते थेट परमवीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. विविध हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास परमवीर सिंग यांच्या सांगण्यानुसार वाझेंकडे देण्यात आला होता, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
मंत्र्यांच्या ब्रीफिंगवेळीही वाझेंची उपस्थिती
सचिन वाझे यांच्या टीममधल्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांना रिपोर्टिंग करण्यास मनाई करण्यात आली होती. हायप्रोफाईल प्रकरणात मंत्र्यांच्या ब्रीफिंगवेळी परमवीर सिंग यांच्याबरोबर सचिन वाझेसुद्धा हजर राहायचे. सरकारी गाड्या उपलब्ध असताना वाझे मर्सिडिज, ऑडी या वाहनांनी कार्यालयात यायचे, याकडे अहवालात लक्ष वेधले आहे.
कार्यकारी पद दिल्यामुळे विरोध
निलंबित पोलीस अधिकाऱ्याला परत सेवेत घेतल्यास अकार्यकारी पद देण्याचे संकेत आहेत. मात्र सचिन वाझेंना सेवेत घेऊन कार्यकारी पद दिल्यामुळे विरोध झाला होता. सचिन वाझे यांना सीआययूच्या प्रमुखपद देण्याालही विरोध झाला होता. सीआययूचे रिपोर्टिंग तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे असल्याची माहिती आहे. (Hemant Nagrale sends Report to Home Ministry on Param Bir Singh Sachin Vaze Case)
परमबीर सिंग एनआयए कार्यालयात
दरम्यान, परमबीर सिंग आज सकाळीच एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू या दोन्ही प्रकरणांचा तपास करणारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) परमबीर सिंग यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.
सचिन वाझे प्रकरणात आतापर्यंत अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी झाली आहे. सचिन वाझे यांची कोठडी आज संपणार असल्यामुळे एनआयए त्यांची कोठडी वाढवण्यासाठी कोर्टात दाखल करण्यात येईल. परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बनंतर एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित बातम्या :
CCTV VIDEO | मनसुख हिरेनचा मृतदेह सापडल्याच्या आदल्या रात्री सचिन वाझे ‘तिथे’ दिसले
सचिन वाझेंना घेऊन NIA टीमचा लोकल ट्रेनने प्रवास; CSMT आणि कळवा स्थानकात क्राईम सीन रिक्रिएट
(Hemant Nagrale sends Report to Home Ministry on Param Bir Singh Sachin Vaze Case)