बूंदी : राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यातील एका जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. एका डॉक्टरला त्याच्याच मोलकणीने हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल दीड वर्ष हा डॉक्टर या मोलकरणीच्या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकून होता. या काळात या मोलकरणीने त्याला ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळले. एवढे पैसे देऊनही मोलकरणीचे ब्लॅकमेलिंग सुरूच होते. त्यानंतर त्याने पोलिसात तक्रार करताच या मोलकरणीचा खेळ संपला.
ही मोलकरीण डॉक्टराकडे दीड वर्षापूर्वी साफ सफाईचं काम करत होती. त्याचवेळी या महिलेने डॉक्टरकडून 30 हजार रुपये घेतले आणि त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यानंतर या महिलेने या डॉक्टरला बलात्काराच्या आरोपात अडकवण्याची धमकी दिली. तसेच आरोपातून वाचायचं असेल तर पैसे देण्याची मागणीही केली. या प्रकारात महिलेला तिचा नवराही साथ देत होता. दोघांनी मिळून या डॉक्टरची कोंडी करत त्याच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.
हनी ट्रॅपमध्ये अडकलेला हा डॉक्टर दीड वर्षापासून या महिलेला पैसे देत होता. दीड वर्षात त्याने या मोलकरणीला 6.50 लाख रुपये दिले होते. त्यानंतर या दाम्पत्याची हाव वाढली. त्यांनी डॉक्टरकडे थेट 10 लाख रुपये मागितले. एक रकमी रक्कम देण्यास सांगितलं. त्यामुळे डॉक्टरच्या तोंडचं पाणीच पळालं. आधीच साडे सहा लाख दिले. आता अजून दहा लाख रुपये कुठून देणार? असा प्रश्न त्याला पडला.
दहा लाख दिल्यानंतरही यातून सुटका होईल याची काही शाश्वती वाटत नसल्याने अखेर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. प्रकरणाचं गांभीर्य समजून पोलिसांनी ही तात्काळ कारवाई केली. पोलिसांनी या मोलकरणीला आणि तिच्या नवऱ्याला तात्काळ अटक केली.
या महिलेने आतापर्यंत डॉक्टरकडून साडे सहा लाख रुपये उकळले आहेत. हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्यानेच या डॉक्टरने तिला एवढी मोठी रक्कम दिली. डॉक्टरच्या अकाऊंटवरून आणि कॅशने सुद्धा या महिलेने रक्कम घेतली आहे. त्यानंतर त्यांनी दहा लाखाची मागणी केल्याने अखेर डॉक्टरने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे दोघांनाही डॉक्टरच्या निवासस्थानातून अटक केल्याचं पोलीस ठाण्याचे प्रभारी सहदेव मीणा यांनी सांगितलं. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.