लखनऊ : भारतात ग्रामीण भागात आजही तरुण मुलगा किंवा मुलगी यांना स्वखुशीने प्रेम करण्याची मुभा नाही. त्यांच्या प्रेमाला समाजात स्थान नाही. त्यांच्या भावनांचा अनेकांकडून आदर केला जात नाहीय. त्यांना प्रेम प्रकरणावरुन हिणवलं जातं. अशा अनेक घटना वारंवार समोर येताना दिसतात. विशेष म्हणजे काही घटना त्यापुढे जावून एखाद्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरतात. या प्रकरणातील काही माणसं स्वत:च्या खोट्या सन्मानासाठी आपल्या घरातील तरुण मुलगा किंवा मुलीची हत्या करतात.
मुलीने स्वखुशीने प्रेम केलं म्हणून आपण तिची हत्या केली असं दाखवत खोटी इज्जत कमविण्याचा प्रयत्न करतात. पण कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. प्रत्येकाला आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. या अधिकारावर गदा आणणाऱ्या कुटुंबियांना अखेर जेलची हवा खावी लागते. तशीच काहिशी घटना उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात घडली आहे.
संबंधित घटना ही मेरठच्या भावनापूर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. पीडित मुलीचं रोमा असं नाव होतं. तिचं गावातील राहुल नावाच्या तरुणावर प्रेम होतं. खरंतर दोघं एकमेकांवर खूप प्रेम करत होते. त्यांनी परस्पर संमतीने लग्न देखील करण्याचं ठरवलं होतं. ते आपल्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आपापल्या कुटुंबियांकडे गेले. पण मुलीच्या कुटुंबियांनी तो प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे रोमा आणि राहुल या दोघांनी जुलै महिन्यात कायदेशीररित्या लग्न केलं होतं. त्यानंतर ते आपापल्या घरीच राहत होते.
दोन दिवसांपूर्वी रोमाने आपल्या कुटुंबियांना राहुलसोबत लग्न केल्याची माहिती दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबात प्रचंड गदारोळ सुरु झाला. तिच्या कुटुंबियांनी तिला एक खोलीत डांबलं. तिथे तिला प्रचंड मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिच्या मृतदेहाचा बंदोबस्त करण्याचा प्लॅन आखला. त्यासाठी ते तिचा मृतदेह स्मशानभूमीत घेऊन गेले. तिथे त्यांनी तिचा मृतदेह जाळून टाकला.
दुसरीकडे रोमाच्या घरी एवढ्या सगळ्या घडामोडी घडून गेल्या तरी राहुलला त्याची चाहूल लागलेली नव्हती. अखेर गावातील काही नागरिकांकडून त्याच्या कानावर रोमाच्या हत्येची माहिती मिळाली. राहुलचं रोमासोबत कायदेशीररित्या लग्न झालेलं होतं. त्यामुळे त्याने थेट पोलीस ठाणे गाठत आपल्या पतीची तिच्याच कुटुंबियांनी हत्या केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी राहुलकडून सर्व माहिती नोंद केली. त्यानंतर त्याची तक्रार दाखल करुन घेतली.
पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलीस रोमाच्या घरी दाखल झाले. पण तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. पोलिसांनी तिथे असलेल्या आजूबाजूच्या नागरिकांकडून संबंधित प्रकरणाची माहिती मिळवली. त्यानंतर पोलीस स्मशानभूमीत जावून रोमाला जिथे जाळण्यात आलं होतं तिथे दाखल झाले. यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक टीम आणि एक्सपर्ट टीमची मदत घेतली. त्यानंतर पोलिसांनी रोमाच्या कुटुंबातील 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस त्या सर्वांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
हेही वाचा :
Mumbai NCB Raid: रेव्ह पार्टीची इन्स्टावर जाहिरात, तीन दिवस कशी रंगणार होती पार्टी?; वाचा सविस्तर
सुपरस्टार शाहरुखचा मुलगा आर्यन खान अखेर अटकेत, इतर 8 जणांवरही कारवाई, आता पर्याय काय?