औरंगाबाद: जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ढोरकीन (Dhorkin in Paithan) गावात शनिवारी पहाटेच एक भयंकर प्रकार उघडकीस आला. या परिसरातील एका शेतात वॉचमन असलेल्या 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रानं (Murder Case) हत्या केलाचं निदर्शनास आलं. विशेष म्हणजे हत्या करणाऱ्या अज्ञातांनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाला आणि घटनास्थळालाही धुतल्याचं पोलिसांच्या पाहणीत दिसून आलं आहे. हा भयंकर प्रकार पाहून ढोरकीन गावाला मोठा हादरा बसला आहे.
या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या तरुणाचे नाव संदीप सूर्यभान साळवे असून तो औरंगाबाद येथील आंबेडकर नगर येथील रहिवासी होता. तो ढोरकीन येथील एका शेतात वॉचमन म्हणून कामाला होता. शेतातीलच एका खोलीत तो राहत होता. त्याच्यासोबत शेतात आणखी दोन तरुण राहत असत. आठवडा किंवा पंधरवाड्यातून एकदा संदीप औरंगाबादेत येत असे. शनिवारी पहाटे शेतातून जात असताना नागरिकांना संदीपचा मृतदेह घराबाहेर पडलेला दिसला. त्याच्या डोक्याला गंभीर जखमाही दिसून आल्या.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच पैठण एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हा गंभीर प्रकार पाहून पुढील तपासाकरिता फॉरेन्सिक पथकाला बोलावण्यात आले. या पथकाने पाहणी केली असता मृतदेह धुतलेल्या अवस्थेत सापडला. ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर आरोपींनी मध्यरात्रीच्या सुमारास संदीपची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली असावी आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घरातील रक्ताचे डाग धुवून काढण्याचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज पथकाने व्यक्त केला.
दरम्यान या हत्येच्या पुढील तपासासाठी संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या मारेकऱ्याचा शोध घेत आहेत.
इतर बातम्या-