औरंगाबाद: 17 सप्टेंबर रोजी औरंगाबादमधील शिवाजीनगर भाजी मंडईत पोलीस सहाय्यक आणि एका महिलेवर हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा थरार घडवणाऱ्या कुख्यात गुंड टिप्याचा आणखी एक भयंकर कारनामा उघड झाला आहे. या घटनेनंतर पुंडलिक नगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक (Pundlik nagar police and Crime branch) टिप्याच्या शोधात आहेत. घटनेनंतर दोन दिवसांनी पोलिसांनी नाशिकमधील येवल्यात छापाही टाकला होता. पण तेथूनही त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिली. पण या दरम्यान 18 सप्टेंबरदरम्यान फरार होण्यासाठी टिप्या ऊर्फ शेख जावेद शेख मकसूद याने साथीदारांच्या मदतीने केवढे भयंकर कृत्य केले, हे शुक्रवारी 24 सप्टेंबर रोजी उघड झाले.
पुंडलिक नगरमधील भाजीमंडईत जीवघेणा हल्ला करून पळून गेल्यानंतर टिप्याला औरंगाबादमधूनही बाहेर पडायचे होते. त्यासाठी त्याने मैत्रीण शीतलशी संपर्क साधला. परंतु तिच्याकडेही पैसे नव्हते. पूर्वी हर्सूल कारागृहात कार्यरत असलेले आणि आता लातूरला कार्यरत असलेले कारागृह रक्षक सतीश तुकाराम उंबरहंडे यांच्याशी शीतलची ओळख होती. त्यांना फसवण्याचा प्लॅन आरोपींनी आखला.
– शीतलने उंबरहंडे यांना प्लॉटचा फेर करण्याच्या बहाण्याने लातूरहून औरंगाबादला बोलावले.
– दुपारी तीन वाजता उंबरहंडे सिडकोमधील क्रेझी बाइट हॉटेलमध्ये आले.
– त्यानंतर आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवत आय-10 वाहनातून त्यांचे अपहरण केले.
– त्यांच्या खिशातले 15 हजार रुपये रोख काढून घेतले.
– त्यांना जीवे मारण्याची धमकी देत तुळजापूर शिवारातील दोन प्लॉट बळजबरीने शीतलच्या नावावर करून घेतले.
– त्यानंतर उंबरहंडे यांच्याकडे 4 लाख 40 हजार रुपयांची खंडणी मागितली.
– उंबरहंडे यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांना आरोपींनी बराच वेळ डांबून ठेवले.
– उंबरहंडे यांनी त्यांच्या परिचयाच्या व्यक्तीकडून एक लाख रुपये शीतलच्या फोन-पे खात्यात ट्रान्सफर केले.
– त्यानंतर टिप्या शहरातून पसार झाला.
पुंडलिक नगर पोलीस पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक टिप्याच्या मागावरच होते. फरार टिप्याचे मोबाइल लोकेशन आणि डेटाची पाहणी करीत असताना शीतल, अर्जून आणि दीपक या तीन साथीदारांच्या क्रमांकावर टिप्याने वारंवार फोन केल्याचे उघड झाले. आधी पोलिसच या सगळ्या प्रकाराच मदत करत असल्याचा पथकाला संशय आला. मात्र उंबरहंडे यांची चौकशी केली असता टिप्याचा कारनामा उघड झाला.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी टिप्याची मैत्रीण शीतल चव्हाण, दीपक पाटील आणि अर्जून पाटील या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
टिप्या हा अल्पवयीन असल्यापासूनच गुन्हेगारी क्षेत्रात आहे. पूर्वी तो पोलिसांना गुन्ह्याविषयी माहिती देत असे. म्हणजेच पोलिसांचा खबऱ्या म्हणून काम करत असे. स्वतःला मौत म्हणवणारा टिप्या गुन्हे करता करता पोलिसांना इतर गुन्हेगारांची टिपही देत असे. टिप्याकडून पोलिसांना गुन्ह्यांची माहिती मिळत असे म्हणून त्याच्या गुन्ह्यांकडे पोलिसांनीही दुर्लक्ष केले. बघता बघता टिप्या अट्टल गुन्हेगार झाला. आता टिप्याला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्याच्यावर चारपेक्षा जास्त खून, अनेक विनयभंग, लूटमार, जबरी चोरी, खंडणी, व्यापाऱ्यांना धमकावणे, खुनाचा प्रयत्न करणे आदी गुन्हे दाखल आहेत.
इतर बातम्या-