आझमगड : कोणासोबत कधी काय घडेल हे सांगता येत नाही. कधी कधी तर चुकी नसताना देखील लोकांना एखाद्या गोष्टीचा भूर्दंड बसतो. अशीच एक घटना घडलीये उत्तर प्रदेशमधील आझमगड जिल्ह्यात. ज्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पतीला 13 महिने तुरुंगात काढावे लागले. तीच पत्नी आता जिवंत सापडली आहे. तुरुंगातून जामिनावर सुटताच पतीने पत्नीचा शोध सुरु केला आणि तिला शोधून काढलंच. आता मात्र पत्नीच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
मसोना सुखपूर गावात राहणारा दिपू याचा विवाह रुची सोबत झाला होता. लग्नानंतर दोघांमध्ये काही जमलं नाही. सतत वाद होत होते. त्यामुळे पत्नी घर सोडून निघून गेली. त्यानंतर ती मामाकडे राहत होती. पण पंचायतने तिला नांदण्यासाठी आग्रह केला. ती पुन्हा एकदा सासरी परतली.
सासरच्या घरी आलेली रुची आठवडाभर अचानक गायब झाली. दीपू आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिचा खूप शोध घेतला पण काहीही माहिती मिळत नव्हती. आता मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसात दिपू आणि त्याचा कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर दीपूला पोलिसांनी अटक केली.
आता सत्य समोर आल्यानंतर पत्नी रुचीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित दीपू म्हणतो की, मी 13 महिन्यांपासून तुरुंगात आहे. त्यानंतर जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पत्नीचा शोध सुरू केला. त्यानंतर ती भिंड जिल्ह्यातील जियानपूर येथे आढळली. यानंतर रुची आणि तिचे मामा आणि तिच्या बहिणीविरुद्ध तपास सुरु आहे.
पीडित दीपुच्या नातेवाईकांनी सांगितले की, आपण निर्दोष आहोत, असे वारंवार सांगत होतो. तरी देखील ३ दिवस आम्हाला पोलीस ठाण्यात बसवण्यात आले. आमचे ऐकले जात नव्हते. घरची परिस्थिती दयनीय झाली होती. जमीन विकावी लागली, तो आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर उसाचा गाडा चालवून आपला उदरनिर्वाह करतो आहे.