सातारा : सातारा तालुका हद्दीत नागठाणे गावात एका महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मालन बबन गायकवाड असं 55 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. या महिलेला दारूचं व्यसन होतं. ते तिच्या पतीला न आवडल्यानं दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. दोघांमध्ये दारूच्या कारणातून भांडणे झाली. यामध्ये पती बबन गायकवाड याने पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला. संशयित आरोपी असलेल्या पती बबन गायकवाडला बोरगाव पोलिसांनी अवघ्या 3 तासांत ताब्यात घेतलं.
पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ म्हणाले, “बोरगाव हद्दीत नागठाणे गावात एक महिला मृत आढळल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही तात्काळ घटनास्थळी दाखल झालो. तेथे मालती बबन गायकवाड नावाची 55 वर्षीय महिला मृत आढळली. तिथं सविस्तर पाहणी केली असता त्यांच्या डोक्यावर आणि अंगावर वार झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे हा खूनाचा प्रकार असल्याचं आम्हाला लक्षात आलं. अधिक चौकशी केली असता त्यांचे 60 वर्षीय पती बबन बाबुराव गायकवाड यांचा संशय आला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात त्यांनी गुन्हा कबुल केला.”
पोलिसांनी आरोपी पतीला पत्नीच्या हत्येचं कारण विचारलं. त्यावर आरोपीने पत्नीला दारु पिण्याचं व्यसन असल्याचा आरोप केला. आरोपी पतीला ते आवडत नव्हतं. यावरु त्यांची सतत भांडणं होत होती. घटनेच्या दिवशी पुन्हा भांडणं झाली. त्यावेळी वाद जास्त विकोपाला गेला आणि आरोपीने लाकडी दांडक्याने पत्नीच्या डोक्यावर अंगावर वर्मी घाव घालून त्यांचा खून केला.
घटनास्थळाची पाहणी करताना एक पत्र्याची पेटी आढळली. त्या पेटीत 3 देशी दारुचे बॉक्स होते. त्यात 90 मिलीच्या 300 दारूच्या बाटल्या होत्या. याबाबत आरोपीकडे सखोल चौकशी करण्यात आली. या प्रकरणात आरोपीने गुन्हा कबूल केलाय. दरम्यान आरोपीच्या घरातून 300 देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. आरोपीकडे चौकशी केली असता सर्व दारूच्या बाटल्या अविनाश साळुंखे या व्यक्तीने ठेवल्या असल्याचं सांगितलं. त्यानंतर या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांनी दिली.
Husband murder wife for having alcohol addiction in Satara