सोलापूर / 24 जुलै 2023 : बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश करण्यास बार्शी पोलिसांना यश आले आहे. बार्शीमधील एका घरात बेकायदेशीर गर्भपात केंद्र चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे. धक्कादायक बाब म्हणजे आठ पैकी चार आरोपी या महिला आहेत. एका महिलेचा गर्भपात करत असताना पोलिसांनी धाड टाकत पर्दाफाश केला. सहा महिन्यापासून हा बेकायदेशीर गर्भपाताचा गोरखधंदा सुरु होता. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर घटनेबाबत मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून बार्शी पोलीस पुढील तपास करीत आहे.
बार्शीतील कासारवाडी रोड येथील सोनल अनंत चौरे यांच्या घरात बेकायदेशीर गर्भपात सुरु असल्याची गुप्त माहिती बार्शी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर घरावर पाळत ठेवली. रात्री 11 च्या सुमारास एक संशयित महिला चौरे यांच्या घरात घुसली. पोलिसांनी संधी साधत घरात घुसून पाहिले असता आत एका बेडरुममध्ये एक महिला बेडवर झोपली होती, तर अन्य तीन महिला तिच्या शेजारी उभ्या होत्या.
यावेळी बेडवर झोपलेल्या महिलेची विचारपूस केली असता आपण गर्भपातासाठी येथे आल्याचे तिने सांगितले. यानंतर तिथे उपस्थित अन्य महिलांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली. त्यातील एक महिला नर्स आहे, तर दुसरी रुग्णालयात आयाचे काम करते. सुषमा किशोर गायकवाड, उमा बाबुराव सरवदे, नंदा गायकवाड, दादा सुर्वे, सोनू भोसले, सुनिता जाधव आणि राहुल बळीराम थोरात अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून गर्भपातासाठी लागणारे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.