औरंगाबाद: मित्राच्या आजीच्या घरी सतत येणं-जाणं करत असलेल्या एका सुशिक्षित तरुणाने एकदा मौजमजेसाठी या आजीच्या घरी चोरी केली. ही पहिली चोरी यशस्वी झाल्यानंतर तरुणाला आणखीच आत्मविश्वास आला आणि पुढच्या वेळी त्याने तब्बल 4 तोळे दागिन्यांवरच डल्ला मारला. औरंगाबादमधील (Aurangabad crime) छावणी परिसरात ही घटना घडली. नातवाचा मित्र हा आपला नातूच या विश्वासाने आजी या तरुणाला घरात येऊ देत होती, मात्र या तरुणाने असा विश्वासघात करत आजीच्या सोन्यावर डल्ला मारला. यामुळे आपले कोण आणि परके कोण हे समजणेच कठीण झाले आहे, असा सूर औरंगाबाद शहरातील नागरिकांच्या चर्चेतून उमटला.
शहर पोलिस दलातून 2018 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या शमा नियाज अहेमद शेख या पडेगावमधील अन्सार कॉलनीत मुलगा व सुनेसोबत राहतात. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी उदरनिर्वाहासाठी किराणा दुकान सुरू केले. 6 ऑक्टोबर रोजी घरात असताना त्यांनी कामानिमित्त कपाट उघडले. तेव्हा एक महिन्यापूर्वी ठेवलेले रोख अडीच हजार रुपये दिसून आले नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या पिशव्या पाहिल्या असता, त्यात दोन तोळे सोन्याच्या बांगड्या, दीड तोळे सोन्याचे गंठन, अर्धा तोळा वजनाचे कानातले व एक सोन्याची एक तोळा वजनाची अंगठी आढळून आली नाही.
गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक मनोजकुमार शिंदे यांच्या पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी चौकशी सुरू केली. शेखच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची माहिती घेतली. त्यात शेख यांच्या नातवाचा मित्र असलेला आफताबचे मागील काही दिवसांत अधिक ये-जा असल्याचे कळाले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता अफताबने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्याच्या राहणीमानातील बदलाविषयी विचारल्यानंतर मात्र त्याची धांदल उडाली. यापूर्वी शेख यांच्या घरात गेल्यानंतर चोरी केली. त्याची फार चर्चा झाली नाही. त्यामुळे त्याचा विश्वास वाढला व त्याने या वेळी मात्र थेट सोन्याचे दागिनेच चोरून नेले.
मागील काही महिन्यांपासून आफताबला शेअर मार्केटचा नाद लागला आहे. त्यात काही पैसे गुंतवले. इंग्रजी शाळेतून शिकलेला आफताब सध्या बंगळुरूला फार्मसीचे शिक्षण घेतो. शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यासाठी ही चोरी केल्याचे आफताबने कबूल केले. पोलिसांनी नंतर सराफाकडून सर्व दागिने जप्त केले. आघाव, शिंदे यांच्यासह अंमलदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, विशाल पाटील, विलास मुठे, रमेश गायकवाड यांनी ही कारवाई केली. न्यायालयाने त्याची शनिवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याचे सहायक निरीक्षक पांडुरंग भागिले यांनी सांगितले.
आजीच्या घरात चोरी केल्यानंतर हा चोर हे सर्व दागिने विकण्यासाठी एका सराफ्याच्या दुकानात गेला. सराफाने, मी लहान मुलांकडून सोने विकत घेत नाही, असे सांगितले. त्यानंतर त्याने एका महिलेची मदत घेतली व तिला पैशांचे आमिष दाखवले. त्यानंतर त्या महिलेने त्याला भाचा सांगून सराफाला सर्व दागिने विकले. त्यातून काही पैसे तिला देऊन त्याने सर्व पैसे स्वत:कडे ठेवले.
इतर बातम्या