रायपूर : दिवाळीसाठी सुट्टी दिली नाही म्हणून दोन कर्मचाऱ्यांनी मालकाची हत्या (Workers Killed Owner) केल्याची धक्कादायक घटना झारखंडमधील रायपूर (Raipur Jharkhand) येथे मंगळवारी रात्री घडली. पोलिसांनी अर्ध्या तासात दोन्ही आरोपींना अटक (Accused Arrested) केली आहे. सागर सिंह सैयाम आणि चिन्मय साहू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अजय गोस्वामी असे हत्या झालेल्या मालकाचे नाव आहे. आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय गोस्वामी याचे रायपूरमध्ये महाराजा मॅगी पॉईंट नावाचे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये सागर सैयाम आणि चिन्मय साहू दोघे काम करत होते. गोस्वामीचा या दोन कर्मचाऱ्यांशी पैशाचा वाद सुरु होता.
गेल्या अनेक महिन्यांपासून गोस्वामीने कर्मचाऱ्यांना वेतन दिले नव्हते. यावरुन कर्मचारी आणि मालकामध्ये नेहमी वाद व्हायचा. दिवाळीचा सण असातनाही मालकाने पैसे दिले नाही, शिवाय सुट्टीही दिली नाही.
अजयने दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी या दोघांना काम करण्यास सांगितले. यावर दोघांनीही काम करण्यास नकार दिला. यामुळे अजयने दोघांना दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी अजयला लोखंडी रॉडने मारहाण करत हत्या केली.
हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली. आरोपी गावी पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना बस स्टँडवर पकडले.