रायगड : सुधागड तालुक्यातील पाली येथील एका तरुणीने लग्नास नकार दिल्याने तिच्याच घराच्या दारात तरुणाने स्वतःला पेटवून घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली. प्रणय केशव बडे राहणार आंबेघर असे आत्महत्या (Suicide) करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान प्रणयच्या नातेवाईकांनी घातपताचा संशय व्यक्त केली आहे. या घटनेची सखोल चौकशी (Inquiry) करावी आणि सत्य बाहेर काढून दोषींवर कठोर कारवाई (Strict Action) करावी, अशी मागणी केली आहे. तक्रारींचे रितसर निवेदन देखील दिले आहे.
पालीतील मधली आळी येथील संकल्प बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या तरुणीने पाली पोलीस स्थानकात घटनेची खबर दिली. लग्नाला नकार दिला म्हणून प्रणय बडे याने तरुणीच्या दारात अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले.
भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या इमारतीत ही घटना घडल्याने नागरिकांनी प्रणयला वाचविण्यासाठी मदतीसाठी धाव घेतली. येथील वीजपुरवठा तातडीने खंडित केला. त्यानंतर पाली पोलिसांच्या मदतीने प्रणयला तात्काळ पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी प्रणय बडेला मृत घोषित केले.
प्रणयचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पाली व पोलीस स्थानकात गर्दी केली होती. याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी आणि यामध्ये दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर हे देखील मध्यरात्री पाली पोलीस स्थानकात आले. त्यांनी पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे यांच्या साहाय्याने जमावाला संयमाने हाताळले. (In Raigad young man sets himself on fire after girl refuses marriage)