पुणे : MPSC पास दर्शना पवार हत्या प्रकरणाची घटना ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा तरुणीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न झाला. आरोपीच्या हातात कोयता पाहताच तरुणीने प्राण वाचवण्यासाठी पळ काढला. आरोपी तरुणीच्या मागे कोयता घेऊन पळत असल्याची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. त्याने तरुणीवर हल्ला केला. पण त्याचवेळी तिथून जाणारे पुणेकर मदतीला धावले. त्यांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला.
त्यामुळे तरुणीचे प्राण वाचले. शंतनू जाधव असं आरोपीच नाव आहे. पुण्यात सदाशिव पेठ वस्तीत मंगळवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. तरुण आणि तरुणी गाडीवरुन उतरताच आरोपी शंतून कोयता घेऊन तरुणीच्या मागे लागला.
आरोपीने असं का केलं?
सुदैवाने त्यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या पुणेकरांनी हस्तक्षेप केल्याने तरुणीचे प्राण वाचले. आरोपी आणि तरुणी एकावर्गात होते. तरुणीने आरोपीशी बोलण्यास नकार दिला. त्या रागातून आरोपीने हे कृत्य केले. त्रिकोणी प्रेमप्रकरणातून हे सर्व घडल्याची चर्चा आहे.
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला, या दोन्ही तरुणांना माझ्याकडून प्रत्येकी 51,000/- रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे. बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही. पण, त्यांच्या पुढील… pic.twitter.com/1Cxt1DuGBs
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 27, 2023
दोघांची ओळख कशी झाली?
पोलिसांनी आरोपी शंतनू जाधवला अटक केली आहे. तो डोंगरगाव मुळशीचा निवासी आहे. तरुणी कोथरुडच्या सुतारदारा भागात राहते. ती टिळक रोडवरील संस्थेत फॅशन डिझायनिगच शिक्षण घेत होती. कोथरुड येथील कॉलेजमध्ये 12 वी ला असताना आरोपी आणि तरुणी एकावर्गात होते. मुलाच्या विचित्र वर्तणुकीमुळे तरुणीने त्याच्याशी बोलण बंद केलं. तेव्हापासून शंतनूच्या मनात तिच्याबद्दल राग होता. तो सतत तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होता.
सध्या पुण्यात MPSC पास दर्शना पवार हत्या प्रकरणाची घटना ताजी आहे. लग्नाला नकार दिला म्हणून मित्र राहुल हंडोरेने तिची राजगडाच्या पायथ्याशी निर्दयीपणे हत्या केली होती. आता पुण्यातील या कोयता हल्ल्याच्या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्याकडून बक्षीस जाहीर
दरम्यान लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांनी कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवलं. त्यांनी आपला प्राण धोक्यात घातला. या दोन्ही तरुणांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 51 हजार रुपयांच बक्षीस जाहीर केलं आहे. बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही. पण, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. हे दोन्ही तरुण पुण्यात MPSC ची तयारी करत आहेत.