बोईसर : बोईसर पूर्वेकडील बेटेगाव येथील टाटा हाऊसिंग या सोसायटीमध्ये रहिवाशांनी इमारतीखाली पार्किंग करून ठेवलेल्या 4 दुचाकी (Two-Wheeler) मंगळवारी मध्यरात्री 2.30 ते 3 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी चोरल्या. दुचाकी चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरामध्ये कैद झाला असून अनोळखी चोरांचा बोईसर पोलीस (Boisar Police) शोध घेत आहेत. बेटेगाव येथील टाटा हाऊसिंग या गृह प्रकल्पात मंगळवारी मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास 4 ते 5 जण घुसले.
मुसळधार पावसाचा फायदा घेत इमारतीतील रहिवाशांनी खाली पार्किंग करून ठेवलेल्या 4 दुचाकी चोरांनी चोरून नेल्या. दुचाकी चोरी करताना तोंडाला रुमाल बांधलेले हे सर्व चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
चोरी केलेल्या 4 दुचाकींपैकी 2 दुचाकी महागाव रस्त्यावरील गौशाळेजवळ रस्त्याच्या बाजूला झाडीत टाकून दिल्याचे बुधवारी सकाळी आढळून आले. या प्रकरणी तक्रार केल्यानंतर बोईसर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा कसोशीने शोध घेत आहेत.
सणासुदीच्या दिवसात बोईसर पोलीस स्टेशन हद्दीत भुरट्या आणि सराईत चोरांनी उच्छाद मांडला आहे. चोरी, घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे.
बोईसर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याच्या पार्श्वभूमीवर बोईसर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. गृहनिर्माण सोसायट्यांनी देखील इमारत आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे,पथदिवे यांची व्यवस्था, अनोळखी माणसांना प्रवेश बंदी आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक त्याचप्रमाणे घर किंवा खोली भाड्याने देताना भाडेकरूची संपूर्ण पोलीस पडताळणी करण्याचे आवाहन बोईसर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.