राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येमागे लाँरेन्स बिश्नोई गँग असल्याचं बोललं जातंय. त्याचं कनेक्शन थेट अकोल्यातल्या शुभम लोणकरच्या एका फेसबूक पोस्टसोबत जुळतंय. सिद्धीकींवर एकामागोमाग ३ गोळ्या झाडून हत्येमागे ३ वेगवेगळ्या कारणांची चर्चा आहे. कारण ठरतेय ही पोस्ट. शुबू लोणकर नावाच्या व्यक्तीनं ही पोस्ट केलीय. हा लोणकर कोण आहे? त्याआधी पोस्टमध्ये काय म्हटलंय, ते पाहुयात. “ओम् जय श्री राम….भारत जीवन का मूल समजता हूं… जिस्म और धन को में धूल समजता हुं…. किया वही सत्कर्म था जो, निभाया मित्रता का धर्म था जो… सलमान खान, हम ये जंग चाहते नहीं थे पर तुमने हमरे भाई का नुकसान करवाया. आज जो बाबा सिद्दीके के शराफत के पूल बांध रहै हे, वहीं एक टाईम में दाऊद के साथ मकोका एक्ट में था. इस के मरने का कारण अनुज थापन और दाऊद को बॉलिवूड, राजनीती, प्रॉपर्टी डीलिंग से जोड़ना था. हमारी किसी से कोई दुश्मनी नहीं, पर जो भी सलमान खान और दाऊद गैंग की हेल्प करेगा अपना हिसाब किताब लगा के रखना. हमारे किसी भी भाई को कोई भी मरवाएगा, तो हम प्रतिक्रिया जरूर देंगे. हम ने पहले वार कभी नहीं किया”, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मूळ अकोल्यातल्या शुभम लोणकर लाँरेन्स बिश्नोई गँगचा जवळचा आहे. गँगस्टर लॉरेंस बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोईसोबत लोणकरच्या संवादाच्या अनेक क्लिप्सही समोर आल्या होत्या. याआधी अनेकदा त्याच्याकडून पिस्टल जप्त करण्यात आल्या आहेत. बंदूक तस्करीत त्याला अटकही झालीय. मात्र पोस्ट करणारा शुभू लोणकर हाच शुभम लोणकर आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. अनेक दिवसांपासून तो पुण्यातल्या वारजेत राहायचा. सध्या तो जामिनावर बाहेर होता. आता शुभू लोणकर सिद्धीकींच्या हत्येनं ज्या अनुज थापनचा बदला घेतल्याचा दावा करतोय. तो अनुज थापन कोण आहे, आणि ही सारी लिंक लॉरेन्शन बिश्नोई आणि सलमान खानसोबतच्या शत्रुत्वाशी कशी जुडते., ते पाहण्यासाठी आपल्याला 6 महिने मागे जावं लागेल.
तारीख 14 एप्रिल 2024. ठिकाण वांद्रेतल्या सलमान खानच्या गॅलेक्सी नावाच्या इमारतीजवळ. मोटरसायकलवरुन जाणाऱ्या दोन्ही शूटर्सनी सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडल्या होत्या. सलमान खानची गॅलेक्सी नावाची इमारत आहे. या इमारतीच्या पहिला आणि दुसऱ्या मजल्यात सलमान खान राहतो. त्याच गॅलरीवर एप्रिल महिन्यात २ जणांनी गोळ्या झाडल्या. एक गोळी ग्रीलच्या खालच्या बाजूला, दुसरी गोळी गॅलरीतल्या आतल्या भिंतीला आणि तिसरी गोळी गॅलरीबाहेरच्या भिंतीला लागल होती. सलमान खान चाहत्यांना या गॅलरीतून अभिवादन करतो. नेमक्या त्याच गॅलरीच्या खाली एक आणि पाठिशी एक गोळ्या झाडण्यात आल्या होता.
सलमान खानच्या घरावरचा हा हल्ला लाँरेन्स बिश्नोई टोळीनं केला होता. गोळीबारानंतर विक्की गुप्ता आणि सागर पाल नावाच्या हल्लेखोरांना गुजरातमधून पकडलं गेलं. दोघांच्या चौकशीनंतर अनुज थापन नावाच्या आरोपीला महाराष्ट्र पोलिसांनी पंजाबमधून अटक केली. अनूज थापन लॉरेन्स बिश्नोई गँगचा शूटर होता. त्यानंच सलमान खानच्या घरावर हल्ल्यासाठी बंदुक पुरवली होती. मात्र काही दिवसानंतर कोठडीतच अनुज थापनचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितलं की, अनुज थापननं टॉयलेटमध्ये चादरीनं गळफास घेवून आत्महत्या केली. मात्र आत्महत्या नाही तर अनुजची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबियांना केला. म्हणूनच शुभू लोणकरनं आपल्या पोस्टमध्ये आमच्या कोणत्याही भावाला माराल तर आम्ही प्रतिक्रिया देवू असं म्हणत इशारा दिलाय.
गोळीबार नेमका कसा झाला? प्रत्यक्षदर्शींनी जी माहिती दिलीय, त्यानुसार समजून घेऊयात. मुंबईतल्या वांद्रेमधील खेरवाडी परिसरात बाबा सिद्धीकी यांचा मुलगा आणि काँग्रेस आमदार जिशान सिद्धीकीचं कार्यालय आहे. साधारण ९ च्या दरम्यान बाबा सिद्धीकी मुलाच्या कार्यालयात आले. रस्ता छोटा असल्यामुळे त्यांनी त्यांची रेंज रोव्हर गाडी बाजूच्या गल्लीत पार्क केली. त्या गाडीतच चालक आणि एक कॉन्स्टेबल होता. अंदाजे रात्री 9.20 च्या दरम्यान बाबा सिद्धीकी एका सहकाऱ्यासह मुलाच्या कार्यालयातून बाहेर पडले.
चालक गाडी घेवून येत असल्यानं सिद्धीकी आणि त्यांचा सहकारी काही मीटर अंतराव गाडीची वाट पाहत उभे होते. कार जवळ पोहोचली तेव्हाच रिक्षातून चेहऱ्याला रुमाल लावलेले तिन्ही हल्लेखोर उतरले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार हल्लेखोरांनी आधी प्रचंड धूर होणारे आपटी बार फोडले आणि लगेच 6 ते ७ राऊंड गोळ्या झाडल्या. सिद्धीकींच्या पोटात 2, एक छातीत तर एक गोळी त्यांच्या सहकाऱ्याच्या पायाला आणि इतर गोळ्या गाडीला लागल्या. हल्ल्यावेळी दोन आरोपी फायरिंग करत होते, आणि तिसरा त्यांना कव्हर देत होता.
बाबा सिद्धीकींवर गोळ्या झाडणाऱ्या 3 आरोपींमध्ये एकाचं नाव धर्मराज कश्यप आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. दुसरा शिवकुमार आहे. तोदेखील मूळ उत्तर प्रदेश आणि तिसरा गुरमैल सिंह हा मूळ हरियाणाचा आहे. चौथा आरोपी जो या तिघांना ऑपरेट करत होता, त्याचं नाव मोहम्मद झिशान अख्तर आहे. गोळीबारानंतरच्या काही अंतरावर यापैकी दोघांना पकडलं गेलं. तर तिसरा आरोपी पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी झाला. गोळीबारांपैकी दोन आरोपी बाजूच्या एका गार्डनमध्ये लपून बसले होते. स्थानिक लोकांच्या मदतीमुळेच दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात आलं.
लॉरेन्स बिश्नोई…जो बिश्नोच गँगचा प्रमुख आहे तो बंद आहे गुजरातच्या अहमदाबाद इथल्या साबरमती जेलमध्ये. त्या बिश्नोईचे काही साथीदार हरियाणाच्या जेलमध्ये आहेत. तिथंच ३ कैद्यांची ओळख बिश्नोई गँगच्या सदस्यांशी झाली. त्यापैकी दोन उत्तर प्रदेशचे होते. तर एक हरियाणाचा होता. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रत्येकी 50 हजार घेवून एकूण चार जण मुंबईत आले. अनेक महिन्यांपासून चारही आरोपी कुर्ल्यात 14 हजार भाडं देवून एका घरात राहिले. त्यांनी सिद्धीकींच्या हत्येसाठी अनेकदा रेकीही केली. डिलीव्हरी बॉयच्या माध्यमातून त्यांना बंदूक पुरवण्यात आली आणि काल त्या चारही आरोपींनी सिद्धीकींची हत्या केली.
लॉरेन्श बिश्नोई गँगचं सलमान खानशी खूप जुनं वैर आहे. बिश्नोई समाज पूर्वजांच्या परंपरेप्रमाणे झाडं आणि काळवीटांना पवित्र मानतो. सलमान खानवर काळवीटांची शिकार केल्याच्या आरोप झाल्यापासून तो लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलीस्टवर आहे. दुसरीकडे बाबा सिद्दीकींचे सलमान खानसह बॉलिवूडशी जिव्हाळ्याचे संबंध राहिलेत. त्यांच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूडचे बडे कलाकार असोत किंवा मग सर्वपक्षीय बडे राजकारणी हे आवर्जून हजेरी लावतात म्हणून सलमान खानचा राग बिश्नोई टोळीनं बाबा सिद्दीकींवर काढला का? अशीही एक शंका आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांपुढे या पोस्टनुसार बाबा सिद्धीकींच्या हत्येमागच्या कारणाची उकल करणं एक आव्हान असणार आहे.