वाराणसी – वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत सर्व्हेचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना धमकी देण्यात आली आहे. न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांना इस्लामिक आगाज मुव्हमेंट नावाच्या संघटनेकडून रजिस्टर टपालाच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आलेली आहे. याची माहिती मिळाल्यानंतर न्यायाधीशांच्या लखनौ आणि वाराणसीतील घरांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी ९ अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तर वाराणसीच्या पोलीस आय़ुक्तांनी या प्रकरणी गुन्हे शाखेला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांनी सांगितले आहे की – नवी दिल्लीतील इस्लामिक आगाज मूव्हमेंट या संघटनेच्या माध्यमातून माझ्याकडे एक रजिस्टर पत्र आले आहे. या पत्रात न्यायाधीशही आता भगव्या रंगासोबत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जहाल हिंदुत्ववादी संघटना आणि त्यांच्या तमम संघटनांना खूश करण्यासाठी सर्वेसारखा निर्णय घेण्यात आला आहे. आणि त्याचे परिणाम विभाजित भारतातील मुसलमानांवर लादण्यात येत आहेत.
चिठ्ठीत पुढे लिहिले आहे की – सध्या कोणती हवा वाहते आहे हे लक्षात घेऊन न्यायीक अधिकारीही चालबाजी करीत आहेत. ज्ञानवापीत होणारे निरीक्षण ही सामान्य प्रक्रया असेल असे वक्तव्य न्यायाधीशांनी केले होते. तुम्हीही मूर्तीपूजकच आहात. तुम्ही मशिदीला मंदिर घोषित कराल. कोणत्याही काफिर, मूर्तीपूजक हिंदू न्यायाधीशाकडून मुसलमान योग्य निर्णयाची अपेक्षा करुच शकत नाही.
सिव्हील न्यायाधीश असलेल्या रवीकुमार दिवाकर यांनी महिनाभरापूर्वी ज्ञानवापीच्या सर्वेच्या दिलेल्या आदेशात, स्वताच्या सुरक्षेबाबत चिंता जाहीर केली होती. यावेळी त्यांनी दुसऱ्यांदा सर्वे करण्याचे आदेश दिले होते. सर्व कुलुपे उघडून किंवा तोडून होणाऱ्या सर्वेला थांबवू नये, असे आदेश त्यांनी दिले होते. या प्रकरणातील निर्णय जाहीर करताना ते म्हणाले होते की – सामान्य प्रकरण असलेल्य़ा या खटल्याला असामान्य ठरवत भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. इतकी भीती आहे की माझ्या नातेवाईकांना माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी वाटते आहे. घराच्या बाहेर असल्यावर सातत्याने पत्नी माझ्या सुरक्षेबाबत चिंतित आहे. तर ११ मे रोजी आईनेही चिंता जाहीर केली आहे. कमिश्नरच्या रुपात मी वाराणसीला जात आहे, याची माहिती बहुतेक त्यांना मिळाली होती. माझ्या आईने जाऊ नकोस, तिथे तुझ्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगितले होते.
न्यायाधीशांनी या चिठ्ठीप्रकरणी पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त वाराणसी आणि राज्याच्या गृहसचिवांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर वाराणसीच्या पोलीस आयुक्तांनी न्यायाधीश दिवाकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.