कल्याण : रिक्षा परमिटमुक्त केल्याने एकीकडे शहरातील रिक्षाची संख्या कमालीची वाढलेली असतानाच रिक्षा चोरी (Rikshaw Theft)च्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. रिक्षा व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असलेले रिक्षा चालक धास्तावले आहेत. रिक्षा चोरांना आळा घालण्याच्या मागणीसाठी रिक्षा संघटनांनी पोलीस उपायुक्तां (Police Deputy Commissioner)ना निवेदन दिले आहे. पोलिसांनी विविध टीम बनवून आरोपीं (Accused)चा शोध सुरू केला आहे. मागील काही महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीच्या रामबाग, देवीचा पाडा, घनश्याम गुप्ते रोड, सिद्धार्थनगर झोपडपट्टी, कल्याण शीळ रोडवरील वैभवनगरी परिसर, दुर्गाडी किल्ला परिसर, गोविंदवाडी रिक्षा चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत.
शहरातील रिक्षाची संख्या प्रचंड वाढली असून परमिटमुक्त केल्यामुळे दररोज शेकडो रिक्षा शहरात नव्याने दाखल होत आहेत. परिणामी रिक्षा चालकांना प्रवासी मिळवताना मोठी प्रतिक्षा करावी लागते. मात्र तरीही दिवसभर रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या रिक्षा चालकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. चाळीत किंवा झोपडपट्टीत राहणारे हे रिक्षा चालक साहजिकच आपली रिक्षा रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवतात. मात्र हीच संधी साधत चोरटे रिक्षाचे लॉक तोडून रिक्षा चोरतात.
गेल्या आठवड्याभरात कल्याण डोंबिवली परिमंडळातील 3 हद्दीतील विविध पोलीस ठाण्यात 9 रिक्षा चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या रिक्षाचा शोध अद्याप लागलेला नसल्याने हातावर पोट असलेले रिक्षाचालक घाबरले असून, आपला पोशिंदा असलेली रिक्षाचे संरक्षण कसे करावे हा प्रश्न त्यांना पडला आहे. दरम्यान, धास्तवलेल्या रिक्षाचालकांनी रिक्षा चोरीला आळा घालण्यासाठी संघटनेने ठोस भूमिका घ्यावी अशी विनंती केली आहे. ठाणे जिल्हा रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांना निवेदन देत रिक्षा चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालत चोरट्यांचा बिमोड करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी ही विविध टीम बनवून आरोपींचा शोध सुरू केला आहे. (Kalyan Dombivli rickshaw stealing gang active, rickshaw associations statement to Deputy Commissioner of Police)