कल्याण : कल्याणवरून नाशिकला जिवंत काडतूस आणि चाकू घेऊन जाणाऱ्या आरोपीला कल्याण जीआरपी आणि आरपीएफने कसारा स्टेशनवरून बेड्या ठोकल्या आहेत. स्वप्नील गोसावी असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर दरोडा, घरफोडी, जबरी चोरी सारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी हे जिवंत काडतूस कशासाठी घेऊन जात होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. कल्याणमध्ये वारंवार अशा घटना उघडकीस येत आहेत. वाढती गुन्हेगारी रोखणं पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
कल्याण जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांना कसारा स्टेशन दरम्यान एका तरुणावर संशय आल्याने त्याची चौकशी केली. त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडून दोन जिवंत काडतूस आणि चाकू असल्याने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, स्वप्नील गोसावी असे या आरोपीचे नाव असून हा आरोपी नाशिकचा राहणारा आहे. तो कल्याणवरून नाशिकला जाण्यासाठी निघाला, मात्र कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने मेल आणि एस्प्रेस गाडीचा प्रवास न करता कल्याणहून लोकल ट्रेनचा प्रवास सुरु केला.
कसारा स्टेशनवर उतरत ते नाशिकच्या दिशेने जात असताना जीआरपी आणि आरपीएफ जवानांना बघून तो घाबरत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना संशय आल्याने लगेचच जीआरपी आणि आरपीएफ जवानांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. आरोपीवर नाशिक पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या ही जिवंत काडतूस कशासाठी घेऊन जात होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत.