ठाणे : चारचाकी गाड्या चोरी करुन त्यांचे सुटे भाग वेगवेगळ्या ठिकाणी विकल्या प्रकरणी मोहम्मद अझरुद्दीन खैराती (45) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 5 लाख 54 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. खैराती हा कुर्ला नेहरुनगर येथील रहिवासी आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी साहिद मिर्जा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे (Kalyan police arrest car theft).
कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज येथे राहणारे जितेंद्र रावरिया यांची ब्रीजा कार 31 डिसेंबर रोजी चोरीस गेली होती. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु होता. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे गाडीचा शोध घेत होते. सीसीटीव्हीच्या आधारे गाडी शोधत पोलीस खालापूरला पोहोचले. तिथे एक गोदाम सापडले, ज्यामध्ये चोरीला गेलेल्या अनेक गाड्यांचे स्पेअर पार्ट्स होते.
पोलिसांनी तपास केला असता तिथे चोरी झालेल्या गाड्यांचे स्पेअर पार्ट विकले जात असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी चोरी गेलेल्या वाहनांचे इंजिन विकणाऱ्याला अटक केली आहे. मात्र कार चोरणारे अजूनही फरार आहेत (Kalyan police arrest car theft).
मुख्य आरोपी साहिद मिर्जा हा मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई येथून वाहने चोरी करुन त्याचे सुटे भाग करुन विकत होता. या कामात खैराती याची त्याला साथ होती. रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे त्यांनी शेड उभारली होती. चोरलेल्या गाड्यांचे भाग गॅस कटरने तोडून त्यांचे भाग विकले जात होते. खालापूर येथील शेडमधून गॅस कटर, सिलिंडर, पाने, कलर हॅण्डल, कलर डबे, दोन मोबाईल, तीन गाड्यांचे इंजिन असा एकूण 5 लाख 54 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अरुद्दीनने खुलासा केला की, त्याचे काही मित्र कार चोरी करतात. चोरीची कार विकू शकत नाही म्हणून चारचाकी वाहनांचे स्पेअर पार्टस काढून ते विकतात. अरुद्दीन हा चोरी केलेल्या वाहनांमधील इंजिन विकण्याचे काम करायचा. या प्रकरणात कारचोरी करणारी टोळी अद्याप फरार आहे. लवकरात लवकर या टोळीचा म्होरक्या शाहिद मिर्जासह त्याच्या साथीदारांना अटक होईल, असं कल्याणचे एसीपी अनिल पोवार यांनी सांगितलं आहे. या टोळीने कल्याण डोंबिवलीसह राज्यात अनेक ठिकाणी चारचाकी वाहने चोरी केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : Special Story | नारपार प्रकल्प : महाराष्ट्राचं पाणी गुजरातला जाणार ही काळ्या दगडावर कोरलेली रेघ