उत्तर प्रदेश : कानपूर जिल्ह्यातील हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. एक 16 वर्षीय क्रिकेटर मुलाचा भर मैदानातच मृत्यू झाला. मॅच दरम्यान एक रन घेण्यासाठी हा मुलगा धावला. जीव तोडून धावलेल्या हा मुलगा रन अप दरम्यान मैदानातच कोसळला आणि अवघ्या 2 मिनिटांत त्याने प्राण सोडला. मैदानात कोसळलेल्या या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. हार्ट अटॅक आल्यामुळे या क्रिकेटर मुलाचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं जातंय.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना कानपूर जिल्ह्यातील बिल्हौर येथील बीआयई मैदानात घडली. एका क्रिकेट सामन्यादरम्यान 16 वर्षीय मुलाने खेळतानाच जीव गमावला. 16 वर्षीय क्रिकेटर रन घेत असताना आधी अडखळला आणि नंतर अचानक पिचवर कोसळला. त्यानंतरत त्याने जागीच प्राण सोडला, असं मृत मुलाच्या कुटुंबीयांनी म्हटलंय.
गेल्या 10 वर्षांपासून त्याला कोणताही आजार नव्हता, असं मृत मुलाच्या कुटुंबीयांनी म्हटलंय. अचानक त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचे ओठ निळे पडले होते, असं डॉक्टरांनी म्हटलं. ओठांच्या बदललेल्या रंगावरुन डॉक्टरांनी या मुलाला हार्ट अटॅक आला असावा, अशी शंका व्यक्त केलीय.
मृत क्रिकेटर मुलाचं नाव अनुज पांडे असं आहे. अनुज आणि सुनित आपल्या दोघा मित्रांसोबत बीआईसी मैदानात क्रिकेट खेळायला गेला होता. त्यादरम्यान अचानक अनुजची तब्बेत बिखडली. तो मैदानातच कोसळला. तेव्हा मैदानातील इतर खेळाडूंनी अनुजच्या दिशेने तत्काळ धाव घेतली. त्याच्या हाता-पायाचे तळवे चोळले.
अनुजच्या शरिरात कोणताही हालचाल होत नाही, हे पाहून या गोष्टीची माहिती अनुजच्या कुटुंबीयांना देण्यात आली. तेव्हा अनुजच्या कुटुंबीयांना त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न केला. पण रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
16 वर्षीय अनुजच्या मृत्यूने त्याच्यासोबत खेळणाऱ्या इतर मुलांना मोठा धक्का बसला आहे. तर अनुजच्या कुटुंबीयांवरही दुःखाचा डोंगर कोसळलाय. गेल्या आठवड्याभरात हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याच्या घटनांचे प्रकार वाढल्याचं दिसून आलं आहे. विशेषतः तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं वाढलेलं प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे काळजी घेण्याचीही गरज व्यक्त केली जातेय.