कर्नाटकच्या गुब्बी पोलिसांनी एक रॅकेटची पोलखोल केलीय. लग्नाच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरु होती. गँगमधील एका महिलेने एकदा-दोनदा नाही, तर चक्क पाच व्यक्तींसोबत लग्न करुन त्यांची फसवणूक केली. पोलिसांना सतत या बद्दल तक्रारी येत होत्या. या गँगचे सदस्य पोलिसांच्या हाताला लागले आहेत. पोलिसांनी नवरीसह तिचे दोन साथीदार आणि लग्न लावून देणाऱ्या दलालाला अटक केलीय. कर्नाटकसह महाराष्ट्रातही या गँगने लोकांची फसवणूक केली होती.
लग्न करुन लोकांची फसवणूक करणाऱ्या या गँगच्या सदस्यांना अटक करण्यात आली आहे. कृषी तज्ज्ञ पलक्षैया यांनी गुब्बी पोलिसात नोव्हेंबर 2023 मध्ये तक्रार नोंदवली होती. कोमल आणि अन्य विरोधात लग्नाच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप केला होता. पोलीस तेव्हापासूनच या गँगच्या मागे लागलेले.
कोमल घरीसुद्धा आली होती
पलक्षैया यांचा मुलगा दयानंद आणि कोमलच लग्न ऑक्टोबर 2023 मध्ये झालं होतं. पलक्षेया यांचा मित्र बसवराजूने त्यांची ओळख लक्ष्मी नावाच्या महिलेसोबत करुन दिली होती. ती मॅरेज एजन्ट असल्याच म्हटलं होतं. लग्न ठरल्यानंतर कोमल आपल्या साथीदारांसह पलक्षैया यांच्या घरी गेली होती. त्या प्रसंगी सिद्दप्पा आणि लक्ष्मी शंभुलिंगा तिथे होते. हे दोघे आपले मामा-मामी असल्याच कोमलने सांगितलं होतं.
लग्न ठरलं म्हणून मॅरेज एजन्टला किती लाख दिले?
ब्रोकरेज फी म्हणून पलक्षैयाने लक्ष्मीला 2.5 लाख रुपये दिले होते. सोबतच साडी आणि दागिने खरेदी करण्यासाठी नवरी मुलीला पैसे दिले होते. त्याशिवाय पलक्षैयाने आपल्या बाजूने मंगळसूत्र आणि ईयर-रिंग्स दिल्या होत्या. लग्नानंतर तीन दिवसांनी कोमल हुब्बाली येथे गेली होती. लग्नानंतर माहेरी जाण्याची रीत असल्याच तिने सांगितलं होतं. त्यानंतर तिचा मोबाइल फोन स्विच ऑफ झाला. तिचा काहीच शोध लागला नाही.
महाराष्ट्रातही फसवणूक
पलक्षैया यांनी सांगितलं की, ते हुब्बालीला सिद्दप्पाच्या घरी सुद्धा गेले. तिथे गेल्यावर आपली फसवणूक झाल्याच त्यांच्या लक्षात आलं. या गँगने आणखी चार लग्न केल्याच समोर आलं. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी कोमलने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या मिरजमधील व्यक्तीशी लग्न केलं होतं. गँगच्या अन्य सदस्यांचा शोध सुरु आहे.