एका किशोरवयीन मुलीने धक्कादायक दावा केला आहे. मागच्या चार वर्षात 64 जणांनी तिचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप या मुलीने केला आहे. त्यामुळे सगळेच हादरले आहेत. केरळच्या पथानामथिट्टामधील हे प्रकरण आहे. पोलिसांनी या प्रकरणात पाच संशयितांना अटक केली आहे. सहावा आरोपी आधीपासूनच तुरुंगात आहे. ही मुलगी अल्पवयीन होती. दोन महिन्यांपूर्वी ती 18 वर्षांची झाली. शाळेच्या समुपदेशन सत्रात ती मुलगी, तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल पहिल्यांदा बोलली असं पथानामथिट्टामच्या बाल कल्याण समितीचे अध्यक्ष राजीव एन यांनी सांगितलं. बाल कल्याण समितीच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. समुपदेशकांनी बाल कल्याण समितीशी संपर्क साधला.
पीडीत मुलगी क्रीडापटू असून क्रीडा शिबिरांसह पथानामथिट्टामधील वेगवेगळ्या ठिकाणी तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं. कोचेस म्हणजे प्रशिक्षक, वर्गातील सहकारी आणि स्थानिक रहिवाशांनी लैंगिक शोषण केल्याचा तिने आरोप केला आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्यातंर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पथानामथिट्टामचे जिल्हा पोलीस प्रमुख या सगळ्या प्रकरणाच्या तपासावर लक्ष ठेऊन आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
त्या मोबाइलवर 40 जणांचे नंबर सेव्ह केलेले
मुलीकडे स्वत:चा मोबाइल फोन नाहीय. ती तिच्या वडिलांचा मोबाईल फोन वापरत होती. या फोनमध्ये तिने तिचा छळ करणाऱ्या 40 जणांचे नंबर सेव्ह केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. पीडित मुलीने जे सांगितलं, ते ऐकूण बाल कल्याण समितीच्या सदस्यांना मोठा धक्का बसला. आरोप खरे आहेत का? हे जाणून घेण्यासाठी मानसोपचार तज्ञांसोबत या मुलीच एक समुपदेशन सत्र झालं. “आमच्या लक्षात आलं की हे एक वेगळं प्रकरण आहे. आम्ही एसपींना चौकशीवर लक्ष ठेवायला सांगितलं आहे” असं बाल कल्याण समितीचे अध्यक्ष म्हणाले. केरळमधील हे प्रकरण हादरवून सोडणारं आहे. पोलीस तपासातून अजून अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात. महिला, मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे बनवण्यात आले. मात्र, अजूनही अशा घटना कमी झालेल्या नाहीत.