Lalbaugh Murder Case : लालबागमधल्या हत्याकांडाने सर्वांनाच धक्का बसलाय. पोटच्या मुलीने आईची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. पोलीस या धक्कादायक प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी अजूनपर्यंत पूर्णपणे या गुन्ह्याची उकल केलेली नाही. लालबागमधल्या चाळीत घडलेलं हे हत्याकांड बुधवारी उघड झालं. या प्रकरणात आरोपी मुलगी रिंपल जैन पोलिसांच्या ताब्यात आहे. हे हत्याकांड उघड झाल्यानंतर याच परिसरातला एक सँडविचवाला गायब झाला. पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशातून अटक केलीय.
हा सँडविचवाला रिंपल जैनला ओळखत होता. शुक्रवारी पोलिसांनी दोघांना समोरासमोर बसवून चौकशी केली. “हा सँडविचवाला व्हॉट्स अपवरुन रिंपलच्या संपर्कात होता. संशयाची सुई त्याच्यावरही आहे. आम्ही क्लीनचीट दिलेली नाही” असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
वेटर्सनी काय पाहिलं?
रिंपलवर मार्बल कटरने आई वीणा जैन (55) यांच्या मृतदेहाचे पाच तुकडे केल्याचा आरोप आहे. यामध्ये या सँडविचवाल्याने रिंपलला काही मदत केली का? याचा तपास पोलीस करतायत. याच प्रकरणात चायनीज रेस्टॉरंटमधल्या दोन वेटर्सची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. वीणा यांना गंभीर जखमी अवस्थेत पाहिल्याचा या वेटर्सचा दावा आहे.
चाळीच्या व्हरांड्यातून खाली पडल्यामुळे त्या जखमी झाल्याची शक्यता या वेटर्सनी व्यक्त केली. हे वेटर वीणा यांना पहिल्या मजल्यावरील रुममध्ये घेऊन गेले. त्यांनी रिंपलला नातेवाईकांना या बद्दल माहिती देण्यास सांगितलं.
रिंपल शेजाऱ्यांना काय सांगायची?
27 डिसेंबरची ही घटना आहे. पण रिंपलने या बद्दल काही केलं नाही. अडीच महिन्यानंतर वीण यांच्या भावाने बहिण बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आलं. रिंपल आई कानपूरला गेल्याच सर्वांना सांगयची. रिंपलवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप आहे.
शेजाऱ्यांनी पोलिसांना काय सांगितलं?
रिंपलच्या संपर्कात असलेल्या सर्वांची जबानी नोंदवण्यात आली आहे. सँडविचवाल्याची चौकशी सुरु आहे, असं झोन 4 चे डीसीपी प्रवीण मुंडे यांनी सांगितलं. पहाटे 4.30 च्या सुमारास टॉयलेटला जाताना आईचा पडून मृत्यू झाला, असं रिपलने पोलिसांना सांगितलं. तपासाच्या भितीने मी घाबरली, त्यातून मी मृतदेहाचे तुकडे केले असं रिपलच म्हणणं आहे. आई आणि मुलीची सतत भांडण व्हायची, असं शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं.