राज्यातील काही वर्षांपूर्वी सहकारी पतसंस्थांचे पेव फुटले होते. अनेक ठिकाणी पतसंस्था स्थापन करुन सर्वसामान्यांकडून लाखो रुपयांच्या ठेवी जमा करण्यात आल्या. या ठेवीचा वापर संचालकांनी कर्ज वाटप करण्यासाठी केला. परंतु कोणतेही तारण न ठेवता, बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वत: कर्ज घेतले तसेच आपल्या नातेवाईकांना कर्ज दिल्याचे प्रकार घडले होते. यामुळे राज्यातील अनेक पतसंस्था अडचणीत आल्या होत्या. आता या संचालकांना दणका देणारा निर्णय न्यायालयाने दिला आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालयाने पाच जणांना जन्मठेपची शिक्षा दिली आहे. तसेच कर्ज न भरणाऱ्या १२ संचालक अन् कर्जदारांना शिक्षा ३ ते १० वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पतसंस्था घोटाळ्यात जन्मठेपेची शिक्षा झालेला हा जिल्ह्यातील पहिलाच निकाल आहे.
अहमदनगर शहरात संपदा नागरी सहकारी पतसंस्था होती. या पतसंस्थेतील घोटाळाप्रकरणी पाच जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यात आरोपी ज्ञानदेव वाफारे, त्याची पत्नी सुजाता वाफारे, साहेबराव भालेकर, संजय बोरा, रवींद्र शिंदे अशी आरोपींची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडी यांनी या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. संपदा नागरी सहकारी पतसंस्था १९ हजारांहून अधिक ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या आहेत.
जिल्हा न्यायालयाने कर्ज न भरणाऱ्यांवर कारवाई केली. १२ संचालक आणि कर्जदारांना ३ ते १० वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्वांनी संपदा पतसंस्थेत १३ कोटी ३८ लाखांचा अपहार केला होता. या अपहार प्रकरणी २०११ मध्ये कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी १७ आरोपींना दोषी ठरविण्यात आले होते.
ज्ञानदेव वाफारे हा याप्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तसेच त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याने तिलादेखील जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वाफारे याने पतसंस्थेच्या पैशातून जमीन, कार, घर खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. पोलिसांनी चौकशी करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. न्यायालयाने १३ वर्षांनंतर आरोपींना शिक्षा झाल्याने ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले.