मुंबई– एकापाठोपाठ एक अशा तीन अभिनेत्रींच्या आत्महत्यांमुळे (3 Suicides) फिल्म इंडस्ट्रीत दहशत निर्माण झाली आहे. बिदीशा डे मुजुमदार (Bidisha Day)आणि पल्लवी डे (Pallavi Day)यांच्या मृत्यूनंतर आता आणखी एका अभिनेत्रीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. मॉडेल आणि अभिनेत्री मंजुषा नियोगी (Manjusha Niyogi)२७ मे रोजी तिच्या घरात मृतावस्थेत सापडली. फाशी घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला. दोन दिवसांपूर्वीच बिदिशा डे हिचाही मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत सापडला होता. बिदीषा आणि मंजुषा या दोन्ही अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. तर पल्लवी डे हिटचा मृतदेह 15 मे रोजी फाशी घेतलेल्या अवस्थेतच सापडला होता. 12 दिवसांत झालेल्या या तीन अभिनेत्रींच्या आत्महत्यांच्या घटनांमुळे बंगी सिनेसृष्टी आणि टीव्ही इंडस्ट्रीला जबर धक्का बसला आहे. या तिन्ही अभिनेत्रींनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं असावा असा विचार प्रत्येकाच्या मनात आहे. आयुष्याचा अशा तऱ्हेने शेवट करणे, हा त्यांना शेवटचा उपाय वाटला का, असा प्रश्नही प्रत्येकाच्या मनात आहे. या तिन्ही अभिनेत्री सध्या डिप्रेशनचा सामना करीत होत्या, आणि तिघींचेही मृतदेह फाशी लावलेल्या अवस्थेत सापडले आहेत. दोन वर्षांपूर्वी ऐन कोरोनाच्या काळात अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाची आठवण यानिमित्ताने पुन्हा आली आहे. एकापाठोपाठ झालेल्या या तीन अभिनेत्रींच्या मृत्यंमुळे, चकचकत्या ग्लॅमरस इंडस्ट्रीचा एक काळोखा कोपरा पुन्हा एकदा समोर आला आहे.
अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतरही, इतक्या कमी वयात सिने अभिनेते, अभिनेत्री जगणं नाकारुन मृत्यूचा मार्ग का स्वीकारतात, हा प्रश्न निर्माण झाला होता. प्रेमात झालेली फसवणूक, ग्लॅमरस इंडस्ट्रीचा झगमागाट, मिळणारी प्रसद्धी कमी होणे, पैसे नसणे, महत्त्व कमी होणे, की इंडस्ट्रीचे प्रेशर, न सांगता येणारा अपमान, वाईट प्रसंग, मानहानी, कशामुळे नेमकं त्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावासा वाटतो, इतकं मोठं डिप्रेशन नेमकं कशामुळे येतं, आणि जीवन संपवणे हाच एकमेव पर्याय उरतो, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहेत. पल्लवी, बिदीशा आणि मंजुषा या तिघींच्या आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेतला, तर अशीच काही कारणे आहेत, असेच दिसून येते आहे.
पल्लवी डे हिच्या मृत्यूची बाचतमी 15 मे रोजी आली. तिच्या राहत्या घरात फासावर लटकलेलल्या अवस्थेत संशयास्पद स्थितीत तिचा मृतदेह सापडला. सुरुवातीच्या तपासात ही आत्महत्या असल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला, मात्र नंतर पल्लवीच्या वडिलांनी, तिचा लिव्ह इन पार्टनर सागनिक चक्रवर्ती याच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. आता तिच्या वडिलांच्या तक्रारीनंतर सागनिक चक्रवर्ती आणि त्याच्या एका मैत्रिणीविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.
तर बिदिशाच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत असे समोर आले आहे की, बिदिशा तिच्या बॉयफ्रेंडमुळे डिप्रेशनमध्ये होती. बिदीशाची तिच्या बॉयफ्रेंडने फसवणूक केली होती, असा आरोप तिच्या एका मैत्रिणीने केला आहे. त्याच्या तीन-तीन गर्लफ्रेंड होत्या. ही बाब जेव्हा बिदिशाला समजली, तेव्हा तिचे बॉयफ्रेंडसोबत मोठे भांडणही झाले होते. त्यानंतर बिदीशा डिप्रेशनमध्ये होती. बिदिशाच्या सुसाईड नोटमध्ये कॅन्सरला उल्लेख होता, मात्र मित्रांनी हे नाकारलेले आहे.
बिदिशा आणि पल्लवी हिच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरु असतानाच, मंजुषा नियोगीच्या मृत्यूने सिने जगत हादरले आहे. बिदिशा या तिच्या मैत्रिणीच्या मृत्युमुळे ती डिप्रेशनमध्ये होती, असे तिनेच पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. तिच्या मैत्रिणीची आत्महत्या यामुळे तिला जबर मानसिक धक्का बसला होता. पोलीस आता या प्रकरणात चौकशी करत आहेत आणि इतरही काही कारणे आहेत का याचा शोध घएत असले तरी मंजुषा ही आपल्या करिअरमुळेही डिप्रेशनमध्ये होती हे वास्तव आहे.
गेल्या काही वर्षांत अनेक सेलिब्रिटींनी आपले जीवन असे संपवले आहे. यात समीर शर्मा, आशिफ बसरा, सावी मडप्पा यांचा समावेश आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचाही मृतदेह घरात सापडला होता. त्याचे मोठे राजकारणही झाले, आत्तापर्यंत त्याचा तपास सुरु आहे. बंगाली अभिनेत्री दिशा गांगुली हिनेही वयाच्या 22 व्या वर्षी आत्महत्या केली होती. ती समलैंगिक होती आणि समाजाच्या दबावाने तिने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. 2018 साली बंगाली टीव्ही अभिनेत्री मोमिता साहा हिचा मृतदेहही पंखाल्या लटकलेल्या अवस्थेत सापडला होता.