भोपाळ : गरम जेवण न दिल्यावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून दिराने वहिनीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे हत्येनंतर दिराने आत्महत्या केली. मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मयत वहिनी BHMS डॉक्टर होती. पोलिसांनी दीर-वहिनीचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.
काय आहे प्रकरण?
देवास जिल्ह्यातील गोपालपुरा भागात आरोपी संदीप आपला भाऊ विजय आणि त्याची डॉक्टर पत्नी राणी हिच्यासोबत राहत होता. गरम जेवण वाढण्यावरुन संदीपचा वहिनीसोबत वाद झाला होता. संदीपने वहिनीला जेवण गरम करण्यास सांगितलं, मात्र तिने नकार दिला आणि ती क्लिनीकला निघून गेली.
क्लिनीकमध्ये जाऊन वहिनीची हत्या
वादावादी झाल्यानंतर काही वेळाने संदीप आपल्या वहिनीच्या क्लिनीकला गेला. तिथे त्याने राणीला गोळी मारली. वहिनीची हत्या केल्यानंतर त्याने भाऊ विजयला फोन केला. मी वहिनीचा गोळी झाडून जीव घेतला आहे, असं त्याने सांगितलं. फोन ठेवल्यानंतर संदीपनेही गोळी झाडून आत्महत्या केली.
हत्येनंतर दिराचीही आत्महत्या
परिसरातील नागरिक जेव्हा क्लिनीकला पोहोचले, तेव्हा राणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.
घरगुती वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. संदीपच्या मृतदेहाजवळ हत्या-आत्महत्येसाठी वापरलेली पिस्तुल सापडली असून तिच्यासह आरोपीची बाईक पोलिसांनी जप्त केली आहे.
संबंधित बातम्या :
मटण कापण्याच्या सुरीने पत्नीची हत्या, पतीची तलावात उडी, दाम्पत्यातील वादाचं कारण काय?
भिवंडीत पोटच्या मुलीवर बापाकडून बलात्कार, 14 वर्षांची पीडिता गरोदर
महिला रुग्णावर शारीरिक अत्याचार, अश्लील फोटो काढून तोतया डॉक्टर पसार