भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये एका तृतीयपंथीयाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. होशंगाबादमध्ये एका तरुणाने तृतीयपंथीयाला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ शूट करुन तो व्हायरलही केला. या प्रकरणात, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, परंतु आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात सापडलेला नाही.
काय आहे प्रकरण?
होशंगाबादच्या ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. पोलीस ठाण्यात तैनात उपनिरीक्षक प्रवीण मालवीय यांनी माहिती देताना सांगितले की, मंगळवारी एका बदमाशाने एका तृतीयपंथीयाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओमध्ये हा तरुण किन्नराला कानशिलात लगावण्यासह क्रूरपणे लाथा मारताना दिसत आहे. आरोपीने त्याच्या एका साथीदाराकडून या मारहाणीचा व्हिडीओ बनवून घेतला आहे.
आरोपीची ओळख पटली
व्हायरल व्हिडीओमध्ये मारहाण झालेल्या तृतीयपंथीयाचा शोध सुरू आहे. त्याचवेळी, मारहाण करणाऱ्या गुंडाचे नाव मार्शल असल्याची माहिती आहे, तो सराईत गुन्हेगार आहे. याशिवाय, याआधीही त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो एका मजुराला मारहाण करताना दिसला होता.
मध्य प्रदेशात सातत्याने मारहाणीच्या घटना
मध्य प्रदेशात, गेल्या काही दिवसांपासून असे व्हिडीओ सतत व्हायरल होत आहेत, ज्यात लोकांना अमानुषपणे मारहाण केली जात आहे. इंदूर, सतना, रीवा आणि नीमच येथील लोकांच्या क्रूरतेचे आणि मारहाणीचे व्हिडीओ समोर आल्यानंतर मध्य प्रदेशच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नाशिकमध्ये तृतीयपंथीयांचा राडा
नाशिकच्या शिंदे टोलनाक्यावर 17 ऑगस्ट रोजी तृतीयपंथीयांचा राडा बघायला मिळाला होता. शिंदे टोलनाक्यावर तृतीयपंथी जबरदस्ती प्रवाशांकडे पैशांची मागणी करत होते. यावेळी एका गाडीतील प्रवाशांसोबत त्यांनी वाद घालत बाचाबाची केली. तृतीयपंथीयांनी प्रवाशांना शिवीगाळ केली. नंतर तीन ते चार तृतीयपंथीयांनी मिळून प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी प्रवाशांनी देखील तृतीयपंथीयांच्या मारहाणीचा प्रतिकार केला. यावेळी दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती.
हाणामारीत दोन प्रवासी जखमी
विशेष म्हणजे ही हाणामारी सुरु असताना टोल प्रशासन आणि सुरक्षा रक्षक यांनी नुसती बघ्याची भूमिका घेतली होती. तृतीयपंथीयांनी एका प्रवाशाला जमिनीवर लोळवत मारहाण केली. या हाणामारीत दोन प्रवासी जखमी झाले. संबंधित घटना घडत असताना टोल नाक्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यापैकी काही जणांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात घटना कैद केली. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला.
टोल नाका परिसरात तृतीयपंथीयांचा सुळसुळाट
खरंतर या टोल नाक्यावर तृतीयपंथीयांचा सुळसुळाटच बघायला मिळतो. प्रवाशांच्या गाड्या अडवणं, त्यांच्याकडे पैशांची मागणी करणं, पैशांसाठी जबरदस्ती आणि दादागिरी करणं, असा सर्रास प्रकार बघायला मिळतो. या दादागिरी करणाऱ्या तृतीयपंथियांना पोलिसांची देखील भीती वाटत नाही. याशिवाय टोल नाक्यावर सुरक्षा रक्षक असूनही ते काहीच करत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
संबंधित बातम्या :