ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये चोरीचा एक विचित्र प्रकार समोर आला आहे. बीए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने फेसबुकद्वारे एका तरुणीशी मैत्री केली. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाल्यानंतर तरुण आपल्या प्रेयसीला भेटायला गेला. घर आणि तिथल्या सोयीसुविधा पाहून तो भारावून गेला. मैत्रिणीने सांगितले की ती या घरात मोलकरीण म्हणून काम करते. 70 वर्षीय निवृत्त शिक्षिकेची काळजी घेण्यासाठी ती तिथे राहते. विद्यार्थ्याची नजर वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्यांवर पडली, तिथून सुरु झाला गुन्ह्याचा कट.
काय आहे प्रकरण?
ग्वाल्हेरमध्ये सात दिवसांपूर्वी घरात एकट्या राहणाऱ्या 70 वर्षीय निवृत्त शिक्षिकेला ओलीस ठेवून, तिच्या तोंडात कपडा भरुन दागिने आणि रोख रक्कम लुटल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे, जे बीए प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत.
चोरीनंतर महाकाल मंदिरात माफी
दरोड्यानंतर आरोपींना आपल्या कृत्याची जाणीव झाली आणि ते थेट उज्जैनला गेले. उज्जैन येथील बाबा महाकाल यांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी चोरीबद्दल माफीही मागितली. त्याच वेळी, त्यांनी तिथे दानधर्म केले, जेणेकरून लुटीचे पाप त्यांच्या माथ्यावर येऊ नये. उज्जैनमध्ये जेव्हा दोन्ही आरोपी माफी मागत होते, तेव्हा येथील पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज आणि रिक्षा चालकाच्या मदतीने दोघांची ओळख पटवली. यानंतर मंगळवारी सकाळी दोन्ही विद्यार्थी परत येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
मुलीला चोरीची माहितीच नाही
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी 8 वर्षांपासून वृद्ध महिलेसोबत काम करत होती. आरोपी तिच्याकडे अनेक वेळा भेटायला येत असे. प्रत्येक वेळी जेव्हा तो महिलेला एकटं पाहत असे आणि तिच्या हातात सोन्याच्या बांगड्या पाहत असे, प्रत्येक वेळी त्याच्या मनात लोभ उसळून येत असे. त्याचवेळी त्याने मनात दरोड्याची योजना आखली. मात्र, पोलिसांचे म्हणणे आहे की, मुलीला या घटनेबद्दल काहीच माहिती नव्हती.
नेमकं काय घडलं?
जनकगंजच्या न्यू शांती नगरात राहणाऱ्या 70 वर्षीय प्रतिभा भटनागर या निवृत्त शिक्षिका आहेत. त्या घरात एकट्याच राहतात. त्याच्यासोबत, एक महिला आणि तिची अल्पवयीन मुलगी (16 वर्षे) वृद्धेची देखभाल करण्यासाठी राहतात. 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास मोलकरीण काही कामानिमित्त बाजारात गेली होती. घरी तिची किशोरवयीन मुलगी होती जी दुसऱ्या मजल्यावर तिच्या खोलीत जेवणासाठी गेली होती. वृद्ध प्रतिभा विश्रांती घेण्यासाठी अंथरुणावर पडल्या होत्या. या दरम्यान दोन्ही आरोपींनी येऊन त्यांचे तोंड दुपट्ट्याने बंद केले, त्यांना मारहाण करून लुटले.
पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा एका इमारतीवर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहिला सुगावा लागला. दोन मुले वृद्धेच्या घराच्या दिशेने जाताना दिसली. पोलिसांनी तपास केला तेव्हा एका ठिकाणी फुटेजमध्ये दोन्ही मुले रिक्षामध्ये बसलेली दिसली. पोलीस पथकाने 24 तासात रिक्षाचा शोध घेतला. असे आढळून आले की ऑटो चालकाने दोन्ही मुलांना हजीरा चौकात सोडले होते.
यानंतर पोलिसांनी हजीरा चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आणि हजीरा येथील प्रसाद नगर गाठले. येथील फुटेजमध्ये दिसणाऱ्या मुलांची ओळख पटली. मोनू गोस्वामी, सनी पाल उर्फ शुभम उर्फ सनी शाक्य अशी त्यांची नावं आहेत. त्यांचे घर गाठल्यानंतर ते उज्जैनला गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
संबंधित बातम्या :
झोपलेल्या आईचा खून, मृतदेह गादीसकट झुडपात टाकला, नराधम पोराचा बार्शीहून मुंबईला पोबारा