भोपाळ : सेल्फी घेताना बाळगलेली निष्काळजी कशी जीवावर बेतू शकते, याचं उदाहरण मध्य प्रदेशातून समोर आलं आहे. जबलपूरमधील भेडाघाट परिसरात नर्मदा नदीत सेल्फी घेताना दोन महिला बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. यापैकी 50 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला असून 22 वर्षीय तरुणी नदीपात्रात बेपत्ता आहे. मुंबईतील घाटकोपरमध्ये राहणारे सोनी दाम्पत्य आपला मुलगा राज सोनी आणि होणारी सून रिद्धी पिछाडिया यांच्यासोबत मध्य प्रदेशात पर्यटनाला गेल्या होत्या.
जबलपूरमधील तिलवारा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या भेडाघाट परिसरात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. सेल्फी घेताना दोघी महिला वाहून गेल्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. 53 वर्षीय अरविंद सोनी, त्यांची पत्नी हंसा सोनी (50 वर्ष), मुलगा राज सोनी (23 वर्ष) आणि होणारी सून रिद्धी पिछाडिया (22 वर्ष) हे भेडाघाटला आले होते.
दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास हंसा आणि रिद्धी दगडांवर उभ्या राहून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्यांचा तोल गेला आणि त्या नदीच्या पात्रात वाहून गेल्या.
स्थानिकांनी उड्या मारुन हंसा सोनी यांना बाहेर काढलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव मेडिकल कॉलेजला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं आहे. तर रिद्धीचा शोध अजूनही सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भेडाघाट हे जबलपूरपासून सुमारे 20 किमी अंतरावर नर्मदा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे पर्यटन स्थळ असून धुवांधार धबधबा हे इथलं मुख्य आकर्षण आहे. नर्मदा नदीकाठी वसलेले संगमरवरी खडक आणि चौसष्ट योगिनी मंदिर पाहायलाही इथे भाविक येतात.
संबंधित बातम्या :
दोन वर्षांनी गूढ उकललं, बाईक प्रवासात मालकाची कर्मचाऱ्याकडूनच हत्या, मृतदेह दरीत टाकला
नकली दातांनी प्रायवेट पार्टसह शरीराचे चावे घ्यायचा, बायकोची पोलीस ठाण्यात धाव
बिहारमध्ये दृश्यमची पुनरावृत्ती, पत्नीच्या प्रियकराला अडकवण्यासाठी प्लॅन करुन मुलीची हत्या