पोलीस नेहमीच जनतेच्या मदतीसाठी तत्पर असतात. अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असतो. पण काहीवेळा एखाद-दुसऱ्या पोलिसाला आपल्या जबाबदारीचा विसर पडतो. त्याच्या वादग्रस्त कृतीमुळे पोलीस खात्यावर ठपका पडतो. अशीच एक घटना समोर आली. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या महिलेवर पोलीस अधिकाऱ्याचा जीव जडला. काहीही करुन त्या पोलिसाला महिलेचा विश्वास जिंकायचा होता. तिला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी या अधिकाऱ्याने सगळे प्रयत्न केले. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून महिलेने वरिष्ठ पोलिसांकडे दाद मागितली. मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील हे प्रकरण आहे.
हरसूद पोलीस स्टेशनच्या पोलीस प्रमुखावर महिलेशी छेडछाड केल्याचा आरोप आहे. महिलेने अनेक दिवस त्याचा त्रास सहन केला. अखेर तिने SP कडे लिखित तक्रार दिली. तिने खंडवाच्या एसपीला अर्ज दिला. तिने अमित कोरी यांच्यावर छेडछाड आणि त्रास देण्याचा आरोप केला. सायबर स्टॉकिंगचा सुद्धा आरोप केला. पीडित महिलेने आपले आरोप सिद्ध करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या प्रमुखाने मोबाइलवर पाठवलेले काही व्हॉट्सएप मेसेज SP ला दाखवले. ही तक्रार मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज कुमार राय यांनी तातडीने कारवाई केली. त्यांनी आरोपी अमित कोरीला तात्काळ प्रभावाने निलंबित केलं. इतकच नाही, या सगळ्या प्रकरणाची चौकशी अतिरिक्त एसपीला दिली.
त्याला फेसबुकवर ब्लॉक
आरोपी अमित कोरीशी ओळख कशी झाली? या प्रश्नावर पीडित महिलेने सांगितलं की, काही काळापूर्वी तिचा नवऱ्यासोबत वाद झाला होता. त्याची तक्रार नोंदवण्यासाठी ती हरसूदचे टीआय अमित कोरी यांना भेटली. पतीसोबत झालेला वाद काही दिवसात मिटला. पण महिलेचा मोबाइल नंबर अमित कोरीला मिळाला. त्यानंतर त्याने चॅटिंग करुन महिलेला त्रास द्यायला सुरुवात केली. पीडित महिलेने त्याला फेसबुकवर ब्लॉक केलं. तेव्हा तो इन्स्टाग्रामवर मेसेज आणि व्हिडिओ कॉल करायला सुरुवात केली. त्याने महिलेला इंदोरमध्ये फ्लॅट विकत घेऊन देण्याचा सुद्धा आश्वासन दिलं. पण या सगळ्या त्रासाला कंटाळून महिलेला वरिष्ठ पोलिसांकडे त्याची तक्रार केली.