तामिळनाडू : तामिळनाडूच्या अरियालूरमधील जयंगाकोंडाजवळ मद्रास उच्च न्यायालयाच्या वकिलाची दिवसाढवळ्या सहा जणांनी हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिरुवरूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले समीनाथन हे मद्रास उच्च न्यायालयात वकील (Lawyer) म्हणून काम करत होते. समीनाथन हे त्यांच्या लहान बहिणीच्या लग्ना (Sisters Wedding)साठी अरियालूरमध्ये आले होते. दोन्ही कुटुंबीयांत उत्साहाचे वातावरण होते.
समीनाथन मद्रास उच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होते. समीनाथन हे जवळच्या हॉटेलमध्ये गेल्याचे सांगण्यात येत आहे. तिथे ते कुणाशी तरी फोनवर बोलत होते. यावेळी तेथे सहा जणांची टोळी आली आणि त्यांनी समीनाथन यांच्यावर हल्ला केला.
हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. आरोपी दोन मोटारसायकवरुन आले होते. घटनेची माहिती मिळताच जयंगकोंडमचे डीएसपी आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. वकिलाच्या हत्येनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. खबरदारी म्हणून तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. आरोपींनी ही हत्या का केली आणि कुणाच्या सांगण्यावरुन केली ? आरोपींच्या शोधासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत.
मयत समीनाथन यांचे वडिल सुब्रमण्यम हे तंजावर जिल्ह्यातील नचियार मंदिरचे रहिवासी आहेत. त्यांना समीनाथन आणि मरियप्पन नावाची दोन मुले आणि थायल नायकी नावाची मुलगी आहे. थायल यांचा विवाह अरियालूर येथे होता. यासाठी सर्व कुटुंबीय अरियालुर येथे आले होते.