mahadev betting app saurabh chandrakar: महादेव बेटिंग अॅपचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकर अखेर जाळ्यात आला आहे. त्याला दुबईत अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जारी केलेल्या इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसनंतर सौरभ चंद्राकरवर कारवाई करण्यात आली आहे. आता सौरभ याला आठवडाभरात भारतात आणले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. चंद्राकर याच्यावर बेटिंग अॅपद्वारे लाखो लोकांची अब्जावधींमध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे.
महादेव अॅपचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकर याचेही डी कंपनीशी म्हणजे दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंध असल्याचा आरोप आहे. फसवणूक प्रकरणात महादेव अॅपवर देशातील अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात बॉलीवूडमधील स्टारची चौकशी झाली आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची या प्रकरणात चौकशी झाली आहे. कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान यांची दुबईत एका लग्नात फेब्रुवारी महिन्यात परफॉर्म केले होते. त्यानंतर त्यांचीही ईडीने चौकशी केली होती. छत्तीसगडचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ॲप प्रवर्तकांकडून कथितपणे 508 कोटी रुपये घेतल्याचा आरोप झाला होता. मात्र, बघेल यांनी आरोप फेटाळून लावले.
5 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने महादेव बेटिंग अॅपसह 22 बेकायदेशीर बेटिंग अॅप आणि वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. ईडीच्या शिफारशींनंतर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69ए अंतर्गत आदेश जारी करण्यात आले.
महादेव बेटिंग अॅपच्या प्रमोटर्सविरोधात मुंबईत 8 नोव्हेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल झाला होता. आरोपींवर फसवणूक आणि जुगार खेळण्याचे आरोप करण्यात आले होते. माटुंगा पोलीस ठाण्यात सौरभ चंद्राकर, रवी उप्पल यांच्यासह 30 पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. एफआयआरनुसार आरोपींवर 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण मुंबई क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी अॅपचे प्रमोटर्स विरोधात कारवाईची मागणी याचिकेत केली होती.