Ganpat Gaikwad Firing | राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळ्या झाडण्याची धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. या गोळ्या काढण्यासाठी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागली. राहुल पाटील यांच्या शरीरातूनही दोन गोळ्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या. जखमींवर ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. स्वत: खासदार श्रीकांत शिंदे तिथे उपस्थित आहेत. या प्रकरणी भाजप आमदारासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली आहे.
गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. जागेच्या वादातून ही फायरींग केल्याची माहिती पोलिसांनी दिली. हत्या करण्याच्या उद्देशाने एकापाठोएक असे सहा राऊंड फायर करण्यात आले. शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाडसह दोन जण जखमी झाले आहेत. राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता आहे. हे दोन्ही राजकीय नेते सत्ताधारी पक्षाचे आहेत. पोलीस ठाण्यातील गोळीबाराच्या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. कायदा-सुव्यस्थेबरोबर, या दोन्ही पक्षातील स्थानिक पातळीवरील मतभेद समोर आले आहेत.
गणपत गायकवाड काय म्हणाले?
“मी 10 वर्षापूर्वी एक जागा घेतली होती. शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांनी जबरदस्ती संबंधित जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. महेश गायकवाड कम्पाऊंड तोडून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होता” अस गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे. “काल संध्याकाळी 400 ते 500 जण घेऊन महेश गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये आले. माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात असताना त्यांनी धक्काबुक्की केली. हा प्रकार मला सहन झाला नाही. माझ्यासमोर ते माझ्या मुलाला हात लावत असतील, तर माझा जगून काय फायदा? त्यामुळे काल रात्री मी आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला” असं गणपत गायकवाड यांनी म्हटलं आहे.