औरंगाबाद : औरंगाबादमधील पळून जाऊन प्रेम विवाह केल्याने बहिणीचं मुंडकं उडवल्याच्या प्रकरणात (Aurangabad Kirti Thore Murder) नवनवीन माहिती समोर येत आहे. लेकीच्या लग्नामुळे वडील संजय मोटेही नाराज होते. त्यामुळे हत्या प्रकरणात मायलेकासोबत त्यांचाही सहभाग होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. तर मुलाने बहिणीचं मुंडकं छाटल्यानंतर (Honor Killing) आई त्या कापलेल्या डोक्यालाही शिव्या घालत असल्याचं बोललं जातं. हत्येच्या वेळी मयत कीर्ती थोरेचा 21 वर्षीय पती अविनाथ थोरेही घरात दुसऱ्या खोलीत होता.
काय आहे प्रकरण?
19 वर्षीय कीर्ती थोरेचा खून 18 वर्षीय भाऊ संकेत मोटे आणि 38 वर्षीय आई शोभाबाई मोटे या मायलेकाने केल्याचा आरोप आहे. कुटुंबाच्या परवानगीविना पळून जाऊन प्रेम विवाह केल्याच्या रागातून कोयत्याने वार करत संकेतने कीर्तीचं डोकं उडवलं होतं. मृत्यूच्या वेळी कीर्ती दोन महिन्यांची गरोदर होती. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाडगावात दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. हत्या केल्यानंतर आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
लग्नानंतर पहिली भेट
ताईला भेटण्याच्या निमित्ताने भाऊ संकेत आणि आई रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास तिच्या सासरी गेले होते. जून महिन्यात कीर्तीने लग्न केल्यानंतर संकेत तिला पहिल्यांदाच भेटला होता. तर लेकीने पळून जाऊन लग्न केल्यानंतर आईने तिच्याशी संबंध तोडले होते. मात्र दहा दिवसांपूर्वी मायलेकीची अचानक भेट झाली होती.
आनंदून आईला बिलगली
शेताजवळ खोली बांधून कीर्ती तिचा नवरा अविनाश थोरे आणि सासरच्या मंडळींसोबत राहत होती. मोटे मायलेक बाईकने रविवारी दुपारी तिच्या घरी आले. त्यावेळी कीर्ती शेतात काम करत होती. आई आणि भावाला आल्याचं पाहून ती धावत त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना घरात घेऊन गेली. कीर्तीचा नवरा त्यावेळी घरातच होता. तो दुसऱ्या खोलीत आराम करत होता. त्याला काही वावगं घडण्याची शंकाही आली नव्हती.
छाटलेल्या मुंडक्यासोबत आईचा सेल्फी
कीर्ती चहा बनवत असताना स्वयंपाकखोलीत जाऊन संकेतने मागून कोयत्याने सपासप वार केले, तर आईने तिचे पाय धरुन ठेवले. बहिणीचं डोकं शरीरापासून वेगळं होईपर्यंत तो वार करत राहिला. कळस म्हणजे त्यानंतर छाटलेल्या मुंडक्यासोबत मायलेकाने सेल्फीही काढला होता. परंतु तो नंतर डिलीट करण्यात आला. पोलीस हा डेटा रिट्रीव्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत. धक्कादायक म्हणजे छाटलेल्या मुंडक्यालाही आई शिव्या घालत असल्याचं काही जणांनी सांगितलं.
19 वर्षीय कीर्तीने कॉलेजमधील मित्राशी विवाह केला होता. हा आंतरजातीय विवाह नव्हता, मात्र परवानगी न घेता पळून जाऊन कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याच्या भावना मोटे कुटुंबाच्या मनात होती.
कीर्तीची कौटुंबिक पार्श्वभूमी
कीर्तीचे माहेर गोळेगाव आणि सासर लाडगाव यामध्ये चार किलोमीटरचे अंतर आहे. माहेरी कीर्ती, संकेत, आई शोभा आणि वडील संजय राहत होते. तिचे वडील शेतकरी आहेत. संकेतने बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून त्यानंतर तो वडिलांना शेतीत मदत करत होता.
जून महिन्यात पळून लग्न
जून महिन्यात कीर्ती कॉलेज मित्रासोबत पळून गेली होती. त्यानंतर आठवड्याभराने तिने लग्न केलं. दरम्यानच्या काळात मोटे कुटुंबाने ती बेपत्ता असल्याची तक्रारही दिली होती. मात्र कीर्तीने पोलिस स्टेशनला हजेरी लावत आपल्या विवाहाची माहिती दिली. हे वृत्त गावात वाऱ्यासारखं पसरल्याने पिता संजय मोटे काहीसे नाराज होते. ते घर सोडून गेले होते आणि काही दिवसांनी परत आले होते.
संजय यांना कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मात्र कीर्तीच्या हत्या प्रकरणात त्यांचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. आरोपी मायलेकाला अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले.
संबंधित बातम्या :
जिचं मुंडकं उडवून जीव घेतला, ती बहीण दोन महिन्यांची गरोदर, वैजापूर हत्या प्रकरणात दोन नवे ट्विस्ट