रायगड : माथेरानमधील लॉजमध्ये (Matheran Lodge Murder) मुंबईकर महिलेचा शिर नसलेला मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याने रविवारी एकच खळबळ उडाली होती. या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. महिलेच्या पतीनेच चारित्र्याच्या संशयावरुन तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. पूनम पाल असं मयत महिलेचं नाव असून ती मुंबईतील गोरेगाव परिसरात राहत होती. मात्र लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच पती राज पालने तिचा जीव घेतला.
रायगड पोलिसांनी हत्येनंतर अवघ्या 24 तासातच आरोपी पतीला बेड्या ठोकल्या. माथेरानमधील इंदिरानगर परिसरात असलेल्या घरगुती लॉजमध्ये रविवारी 12 डिसेंबरला सकाळी केअरटेकरने महिलेचा डोकं उडवलेला मृतदेह पाहिल्यानंतर माथेरानमध्ये एकच खळबळ उडाली होती.
काय आहे प्रकरण?
माथेरानमधील लॉजमध्ये एका महिलेचा शिर नसलेला मृतदेह रविवारी नग्नावस्थेत आढळला होता. दोघांचीही खोटी नावं लॉजच्या रजिस्टरमध्ये लिहिल्यामुळे ओळख पटवण्याच आव्हान पोलिसांसमोर होतं. महिला आणि तिच्यासोबत आलेल्या पुरुषातील नेमकं नातंही सुरुवातीला अस्पष्ट होतं.
माथेरान येथील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोघांचा फोटोही मिळवण्यात पोलिसांना यश आले होते. माथेरानमध्ये प्रवेश करताना दस्तुरी नाका एन्ट्री पॉईंटवरील सीसीटीव्हीमध्ये दोघं कैद झाले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोघांनी फेसमास्क लावलेले असल्यामुळे, तसेच लॉज मालकांनी आधारकार्डसारखे कुठलेही पुरावे न मागता त्यांची नावं रजिस्टरमध्ये नोंदवून घेतल्याने तपासास दिरंगाई झाली होती.
पोलिसांना लॉजपासून काही मीटर अंतरावर एक हँडबॅग सापडली. त्यामधील मेडिकल प्रिस्क्रिप्शनवरुन तपासाचे धागेदोरे गोरेगावपर्यंत पोहोचले. गोरेगाव पोलिसांशी संपर्क साधला असता, पूनम पाल नावाची महिला हरवल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात दिल्याचं समोर आलं.
पतीचा संशयी स्वभाव
पूनमचे लग्न मे महिन्यात पनवेलमध्ये राहणाऱ्या राम पाल याच्यासोबत झालं होतं. दोघंही मूळ उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. पूनम एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. उत्तर प्रदेशातील परंपरेनुसार गौना हा विधी होईपर्यंत पती-पत्नी एकत्र राहत नाहीत. राम संशयी स्वभावामुळे सतत पूनमवर संशय घेत असे. अखेर त्याने तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने माथेरानची निवड केली. दोन वेळा जाऊन त्याने या भागाची पाहणीही केली होती.
11 डिसेंबरला फिरायला जाण्याच्या बहाण्याने त्याने पूनमला माथेरानला नेले. तिथे त्यांनी घरगुती रुम भाड्याने घेतली. रजिस्टरमध्ये त्याने खोट्या नावांची नोंद केली होती. पहाटेच्या सुमारास त्याने धारदार शस्त्राने बायकोचा गळा चिरला आणि डोकं धडावेगळं केलं.
कापलेल्या शिराचे तीन तुकडे करुन वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरले. काळोखातच त्याने त्या पिशव्या दोनशे फूट खोल दरीत वेगवेगळ्या दिशांना फेकल्या. त्यानंतर तो पनवेलला आपल्या घरी निघून आला. पूनमची ओळख पटू नये, म्हणून त्याने हर तऱ्हेचे प्रयत्न केले होते. तिच्या हातावरचा टॅटूही त्याला मिटवायचा होता. मात्र तो पुसला जात नसल्याने त्याने धारदार शस्त्राने तिचा हातही सोलला.
संबंधित बातम्या
माथेरानमध्ये आढळला शिर कापलेला महिलेचा मृतदेह, आरोपीला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान
माथेरानमध्ये हत्या झालेल्या महिलेची ओळख पटली, चारित्र्याच्या संशयावरुन पतीनेच काढला पत्नीचा काटा