सातारा : मुलीच्या आंतरजातीय विवाहाला 19 वर्ष उलटली, तरी वडिलांच्या मनातील रागाची भावना संपलेली नाही. त्यामुळे सासरेबुवांनी चक्क जावयाच्या कानशिलावर पिस्तुल रोखले, मात्र जावईबापूंनी वेळीच सासऱ्यांचा हात अडवल्यामुळे अनर्थ टळला. साताऱ्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली असून खुद्द नातीनेच आजोबांचे प्रताप कॅमेरामध्ये रेकॉर्ड केले.
कोण आहेत सासरेबुवा?
‘पिस्तुलबाज’ सासऱ्यांच्या मुलीचा आणि जावयाचा 19 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना 18 वर्षांची मुलगी आणि एक मुलगाही आहे. तर 66 वर्षीय सासरे हे साताऱ्यातील संगम माहुलीजवळील राजनगर भागात राहतात. ते उत्पादन शुल्क विभागातील निवृत्त अधिकारी असल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या रविवारी दोन्ही नातवंडं आजोबांकडे आली होती. मात्र रात्री उशीर झाल्यामुळे जावईबापू त्यांना आणण्यासाठी आले होते. ते हॉलमध्ये मुलांची वाट पाहत बसले असताना सासऱ्यांनी पुन्हा जुना वाद उकरुन काढला. ‘तू माझ्या मुलीसोबत आंतर जातीय विवाह केलास. त्यामुळे आमची इज्जत धुळीला मिळाली’ असं सासरे म्हणाले. त्यावर जावई आपल्या परीने समजवून सांगण्याचा प्रयत्न करत होते.
नेमकं काय घडलं?
शब्दाला शब्द वाढत गेला आणि सासरे-जावयामध्ये मोठा वाद रंगला. त्यामुळे जावयाने आपल्या बायकोलाही तिच्या माहेरी बोलावून घेतलं. मुलगी ताबडतोब तिथे पोहोचली आणि आमच्या लग्नाला 19 वर्ष उलटल्यानंतरही तुम्ही का वाद घालत आहात, असा प्रश्न तिने आपल्या वडिलांना विचारला. त्यावेळी संतापाच्या भरातच सासरे आपल्या खोलीत निघून गेले.
वडील रुममध्ये गेले आणि…
वडील आत गेले म्हणजे त्यांच्या मनातील राग शांत झाला आणि वाद संपला, असा समज होऊन मुलगी-जावयाने सुटकेचा निश्वास सोडला. मात्र पुढे काय वाढून ठेवलंय, याची पुसटशी कल्पनाही तोपर्यंत कोणाला नव्हती. सासरे काही मिनिटांतच तावातावाने बाहेर आले, तेव्हा त्यांच्या हातात पिस्तूल होती.
“आज तुम्हाला संपवतोच”
सासऱ्यांच्या हातात पिस्तूल पाहून जावई-मुलगा अशा दोघांनाही आधी घामटंच फुटलं. “आज तुम्हाला संपवतोच, दाखवतो मी काय आहे ते” असं म्हणत सासऱ्यांनी जावयाच्या कानाच्या मागे पिस्तूल टेकवले. मात्र घाबरलेल्या अवस्थेतही जावयाने प्रसंगावधान राखले आणि सासऱ्यांचा हात धरला.
आजोबांचा प्रताप नातीकडून रेकॉर्ड
आजोबांनी वडिलांवर पिस्तूल रोखल्याने मुलंही भेदरली. मात्र 18 वर्षांच्या नातीने समयसूचकता दाखवत मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटिंग सुरु केलं. 21 सेकंदांच्या चित्रिकरणानंतर सासरेबुवांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी नातीवरही आवाज चढवत शूटिंग बंद करण्यास बजावलं. मात्र ती ऐकत नसल्याचं पाहून जावयाच्या कानशिलावर ठेवलेली पिस्तूल चक्क नातीवरच फेकून मारली. पण तोपर्यंत आजोबांचा प्रताप नातीने कॅमेरामध्ये कैद केला होता. परंतु जावईबापूंच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनुचित प्रकार घडण्यापासून वाचला.
संबंधित बातम्या :
नागपुरात दारुड्या इंजिनिअर पित्याने पोटच्या मुलीचा गळा आवळला, चिमुरडीचे प्राण कसे वाचले?
मुलगा मेला, मुलगी गळफास घेतेय, लवकर मुंबईला ये, बायकोला माहेरुन बोलवण्यासाठी मुलांच्या मृत्यूचा बनाव