सोलापूर : व्यवसायासाठी पाच लाख रुपयेण आणण्यावरुन पत्नीचा छळ करणाऱ्या मुख्याध्यापकाने परस्पर दुसरा संसार थाटल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात समोर आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापक पतीसह कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या सततच्या पैशांच्या मागणीला कंटाळून विवाहिता माहेरी निघून गेली होती, हीच संधी साधत त्याने दुसरं लग्न केल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडीमध्ये राहणाऱ्या बापू अडसूळ नावाच्या मुख्याध्यापकावर दुसरं लग्न केल्याचा आरोप आहे. तक्रारदार महिला योगिता बापू अडसूळ यांचा विवाह 2012 मध्ये अंकोली येथील बापू अडसूळ यांच्यासोबत झाला होता. आरोपी सध्या म्हैसगाव येथील विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे.
पत्नीकडे पाच लाखांसाठी तगादा
शाळा विनाअनुदानित असल्याने बापू अडसूळ यांना पगार मिळत नव्हता. त्यामुळे त्यांना कॉम्प्युटरचा व्यवसाय सुरु करायचा होता. त्यासाठी त्यांनी पत्नीचा छळ केल्याचा आरोप आहे. माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी त्यांनी पत्नीमागे तगादा लावल्याचा दावा केला जात होता.
महिलेच्या वडिलांनी आरोपीला आधी एक लाख रुपये, तर नंतर तीन लाख रुपये दिल्याची माहिती आहे. तरीही महिलेचा मुख्याध्यापक पतीसह त्याच्या कुटुंबीयांकडून छळ सुरु होता. पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून तक्रारदार पत्नी माहेरी निघून गेली. हीच संधी साधत आरोपीने परस्पर दुसरं लग्न केल्याचा आरोप आहे.
पतीसह सासरच्या सात जणांवर गुन्हा
या प्रकरणी योगिता अडसूळ यांना आरोपी पती बापू अडसूळसह घरातील सात जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. कुर्डूवाडी पोलिसांनी हुंडा प्रतिबंधक कायद्यासह, कौटुंबिक हिंसाचार अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास कुर्डूवाडी पोलीस करत आहेत.
संबंधित बातम्या :
सात जणांची नावं, सुसाईड नोट सेफ्टी पिनने गाठोड्याला अडकवली, कोल्हापुरात महिलेची नदीत आत्महत्या
ठाण्यात महिलेचा गळफास, आत्महत्येपूर्वी मैत्रिणींना व्हिडीओ पाठवून पतीवर धक्कादायक आरोप