भोपाळ : मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर सोमवारी NIA कोर्टात हजर झाल्या. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर भाजपाच्या खासदार आहेत. वर्ष 2008 मधील मालेगावमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटाच हे प्रकरण आहे. या प्रकरणातील सात आरोपींपैकी प्रज्ञा ठाकूर एक आहे. अन्य आरोपी हजर झाल्यानंतर जवळपास दोन तासांनी दुपारी 2 वाजता साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर कोर्टात हजर झाल्या. आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असल्याने सकाळी लवकर उठू शकत नाही, असं प्रज्ञा ठाकूर यांनी न्यायालयात सांगितलं. त्यानंतर न्यायालयाने आरोपींची जबानी नोंदवून घेण्यासाठी प्रकरण 3 ऑक्टोबरपर्यंत स्थगित केलय. अभियोजन पक्षाने 14 सप्टेंबरला न्यायालयाला सूचित केलं होतं की, साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झालीय.
साक्षीची रेकॉर्डिंग पूर्ण झाल्यानंतर न्यायालय गुन्हेगारी प्रक्रिया संहिता (CRPC) कलम 313 अंतर्गत आरोपींची जबानी नोंदवली जाते. फक्त सहा आरोपी प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनेंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (सेवानिवृत्त) रमेश उपाध्याय, अजय रहीरकर, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी न्यायालयात हजर झाले. सुधाकर द्विवेदी यावेळी हजर नव्हते. सुधाकर द्विवेदी यांच्या वकिलाने ते अनुपस्थित राहण्याासठी धार्मिक अनुष्ठानच कारण दिलं. न्यायालयात हजर राहण्यासाठी सवलत मागितली. न्यायालयाने द्विवेदीची याचिका फेटाळून लावली.
29 सप्टेंबर 2008 रोजी उत्तर महाराष्ट्रात मालेगाव शहरातील एका मशिदीजवळ बॉम्ब स्फोट झाला होता. यासाठी मोटरसायकलचा वापर झाला होता. या स्फोटामुळे 6 नागरिकांचा मृत्यू झाला होता. 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. 2011 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं. त्याआधी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणाचा तपास केला.