मालेगाव शहरात रविवारी मध्यरात्री गोळीबार झाला. माजी महापौर अब्दुल मलिक इसा यांच्यावर दोन अज्ञातांनी तीन गोळ्या झाडल्या. या घटनेच्या २४ तासानंतर गोळीबाराचे कारण समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात दुचाकी, गावठी कट्ट्यासह दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूने गोळीबार झाल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दिली. दरम्यान माजी महापौर अब्दुल मलिक यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. त्यांच्यावर नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मलिक हे रविवारी मध्यरात्री १२ ते १ दरम्यान एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत नाशिकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणानंतर आरोपींना शोधण्यासाठी पथके तयार केली. तसेच घटनास्थळावर तपास सुरु केला. त्या तपासाची माहिती अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी माध्यमांना दिली. त्यानुसार, या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस स्थानकात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्याचे म्हटले आहे. दोन्ही बाजूकडून ६ राऊंड फायर झाल्याचे भारती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
माजी महापौर अब्दुल मलिक इसा यांच्यावर हल्ला हा राजकीय वैमानस्यातून झाल्याचा अंदाज सुरुवातीला होता. परंतु पोलिसांच्या तपासात वेगळीच माहिती समोर आली. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी हा हल्ला जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणातून आणि वैमस्यातून झाला असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी हल्ल्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त केली आहे. तसेच गावठी कट्ट्यासह दोघे संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
अब्दुल मलिक इसा हे एमआयएम पक्षाचे नेते आहेत. त्यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मालेगावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. अजून मालेगाव शहरात तणावपूर्ण शांतता आहे. एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी हल्लेखोरांना तातडीने पकडून कारवाई करण्याची मागणी केली आहे.