Sandeshkhali Row | देशाला हादरवून सोडणाऱ्या संदेशखाली प्रकरणातील मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहां शेखला अखेर अटक करण्यात आली आहे. रात्री 3 वाजता TMC नेत्याला अटक करण्यात आली. पश्चिम बंगाल पोलिसांनी त्याला अटक केली. मागच्या 55 दिवसांपासून पोलीस शाहजहां शेखच्या शोधात होते. शाहजहां शेखला मिनखान येथील अज्ज्ञात स्थानावरुन अटक करण्यात आली. पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे महिलांवर लैंगिक अत्याचार आणि जमीन हडपण्याच्या प्रकरणात शाहजहां शेख मुख्य आरोपी आहे.
शाहजहांला पश्चिम बंगाल पोलिसांनी उत्तर 24 परगणाच्या मिनाखान भागातून अटक करण्यात आली. त्याला बशीरहाट कोर्टात नेण्यात आलं. कोलकाता हाय कोर्टाने बुधवारी निर्देश दिलेले की, पश्चिम बंगाल पोलिसांशिवाय सीबीआय आणि ईडी देखील त्याला अटक करु शकते. शेख बऱ्याच दिवसांपासून फरार होता. त्यानंतर कोर्टाने निर्देश दिले की, त्याला पकडण्यासाठी सीबीआय आणि ईडी स्वतंत्र आहे.
एक हजारच्या जमावाने केलेला हल्ला
पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथे 5 जानेवारी रोजी जवळपास एक हजारच्या जमावाने ईडीच्या पथकावर हल्ला केला होता. राज्यातील कथित रेशन वितरण घोटाळा प्रकरणात शाहजहां शेखच्या परिसरात छापेमारी करण्यासाठी ईडीच पथक गेलं होतं. त्यावेळी हल्ला झालेला. ईडीने शाहजहां शेखला समन जारी करुन आज गुरुवारी चौकशीसाठी बोलावल होतं.
‘कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे’
संदेशखालीवरुन भाजपाने तृणमुल काँग्रेसवर सातत्याने हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते सुवेंदु अधिकारी म्हणाले की, “कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. शाहजहां शेखला मृत्यूदंड दिला पाहिजे. संदेशखालीचे लोक आणि संपूर्ण पश्चिम बंगाल यासाठी प्रयत्न करतोय”
एफआयआरमध्ये नाव पण चार्जशीटमध्ये आरोपी नाही
शाहजहां शेखवर तीन हत्यांचा आरोप आहे. एफआयआरमध्ये नाव आहे. पण कुठल्याही चार्जशीटमध्ये आरोपी नाहीय. देवदास मंडल यांचं 8 जून 2019 रोजी अपहरण झालं. त्यांची पत्नी दुसऱ्यादिवशी अपहरणाची तक्रार नोंदवते. त्यानंतर तुकड्यांमध्ये विखुरलेला मृतदेह मिळतो. DNA चाचणीवरुन मृतदेह देवदास मंडलचा असल्याच स्पष्ट झालं. शाहजहां शेखवर हत्येचा आरोप आहे. पण चार्जशीटमध्ये त्याच नाव नव्हतं. ज्यांची नाव एफआयआरमध्ये नव्हती, त्यांना आरोपी बनवलं.