इन्स्टाग्रामवर एका युवकाची मुलीसोबत मैत्री झाली. इन्स्टावर फोटो पाहून त्याला ती मुलगी खूप सुंदर वाटली. युवकाच वय 22 वर्ष आहे. इन्स्टावर मुलीचा प्रोफाईल फोटो पाहून त्याला ती त्याच वयाची वाटली. दोघांमध्ये इन्स्टावर बोलणं सुरु झालं. मैत्री वाढल्यानंतर दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला. युवक मुलीला भेटण्यासाठी तिच्या गावी गेला. तिथे गेल्यानंतर मुलीला पाहून त्याला जबर धक्का बसला. ज्या मुलीवर त्याचा जीव जडलेला, जी मुलगी त्याला सुंदर वाटत होती, ती त्याच्यापेक्षा डबल वयाची होती. आपली फसवणूक झालीय, हे लक्षात आल्यावर तो युवक भडकला. दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. युवकाने महिलेवर हल्ला करुन तिला जखमी केलं. उत्तर प्रदेशच्या कानपुरची ही घटना आहे.
सचेंडी पोलीस ठाणे क्षेत्रात राहणारी एक 45 वर्षीय महिला इन्स्टाग्रामचा वापर करत होती. इन्स्टावर काही महिन्यांपूर्वी तिची मैत्री एका 22 वर्षीय युवकासोबत झाली. इन्स्टावर बोलता, बोलता त्यांची मैत्री प्रेमात बदलली. त्यानंतर तिने युवकाला भेटण्यासाठी बोलावलं. युवक दीपेंद्र तिच्या घरी गेला. तिथे गेल्यावर दीपेंद्रला कळलं की, तो ज्या मुलीच्या प्रेमात पडलाय, ती त्याच्यापेक्षा 22 वर्षांनी मोठी आहे. दिसायला सुद्धा ती तितकी सुंदर नाहीय. इन्स्टाग्रामवर जो फोटो आहेत, त्या तुलनेत काहीच नाही. आपली फसवणूक झालीय, हे त्याच्या लक्षात आलं.
बेल वाजवल्यानंतरही दरवाजा उघडला नाही
त्यावरुन दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. मारहाणीपर्यंत विषय पोहोचला. युवकाने महिलेला जमिनीवर आपटून जखमी केलं. महिलेचा मुलगा घरी आला. बेल वाजवल्यानंतरही दरवाजा उघडला नाही. त्यावेळी त्याने कशीतरी कडी उघडली. महिला जमिनीवर जखमी अवस्थेत पडलेली होती. त्याने लगेच आईला रुग्णालयात दाखल केलं.
तिच्या जबानीनंतरच सत्य समोर येईल
डीसीपी विजय ढुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. महिलेने आपली फसवणूक केली, असं दीपेंद्र म्हणाला. तिने आपल्याबद्दल सर्व खोटी माहिती दिली. तिने स्वत:च वय लपवलं. जेव्हा हे सत्य समोर आलं, तेव्हा सहन झालं नाही. तो प्रचंड चिडला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला अजून बेशुद्ध आहे. तिच्या जबानीनंतरच सत्य समोर येईल.