मुंबई | 17 ऑगस्ट 2023 : देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत (mumbai crime) एका हैराण करणारा धक्कादायक प्रकार घडला आहे. मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनवर (sion station) एका इसमाचा महिला प्रवाशाशी वाद झाला. मात्र त्या भांडणाचा हिंसक आणि दुःखद अंत झाला. पत्नीला धक्का लागल्याचे पाहून तिचा पती त्या इसमाशी भांडू लागला, त्याला मारहाणही केली. त्या दरम्यान मध्येच त्या इसमाचा तोल गेल्याने तो रेल्वे ट्रॅकवर कोसळला आणि समोरून वेगाने आलेल्या ट्रेनखाली (hit by train) सापडून त्याचा अंत झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश राठोड असे मृत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी शासकीय रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अविनाश माने (३१) आणि शीतल माने (३०) या आरोपी जोडप्याचा शोध घेत एक दिवसानंतर त्यांना अटक केली. मृत दिनेश राठोड हा नवी मुंबईतील घणसोली येथील रहिवासी असून तो बेस्ट (BEST)मध्ये नोकरी करत होता. सोमवार (13 ऑगस्ट) रोजी सायन रेल्वे स्टेशनवरी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांच्या पथकाने नंतर तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
त्या फुटेजनुसार, राठोड हा १ नंबर प्लॅटफॉर्म वरून चालत होता व तो महिलांच्या डब्याजवळील जागेवर उभा राहिला. काही मिनिटांनी त्याचा एका महिलेला धक्का लागला असता, तिने त्याला छत्रीने मारायला सुरूवात केली. तिचा पती स्टेशनवर , पुढे काही अंतरावर उभा होता. त्याने हा प्रकार पाहिला व तोही मध्ये पडला.
अपघातानंतर ते जोडपं झालं गायब
त्याने राठोडयाला पकडून त्याच्या तोंडावर एका तडाखा दिला. मात्र ही धडक एवढी भीषण होती की राठोड याचा तोल गेला व रेल्वे ट्रॅकवर कोसळला. त्याच्या दिशेने एक ट्रेन येत होती हे पाहून राठोडने पटकन प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला आणि ट्रेनखाली आला, असे त्या फुटेजमध्ये दिसले. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर ते जोडपं तिथून लगेच पळून गेलं.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि 15 ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेने त्यांना शोधून काढत त्यांना अटक केली. अविनाश हा हाउसकीपिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो तर शीतल ही गृहिणी असून ते दोघे मानखुर्द येथे राहतात, असे पोलिसांनी सांगितले. त्यांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.