नवी मुंबई : ऐरोली येथील सेक्टर 15 मध्ये एक सेवानिवृत्त सैन्य अधिकाऱ्याने आपल्या पत्नीवर गोळीबार केला. शुल्लक कारणावरून पती पत्नीमध्ये वाद झाला होता. या किरकोळ वादातून संतप्त पतीने बंदुकीने स्वतःच्या पत्नीवर गोळी झाडली. सुदैवाने पत्नीने गोळीला हुलकावणी दिल्याने तिचे प्राण वाचले. याप्रकरणी पत्नीने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार केली. पत्नीच्या तक्रारीनुसार पती स्मितेश बाळेफडी यांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे (Man shoots on his wife in New Mumbai).
नेमकं प्रकरण काय?
ऐरोली सेक्टर 15 येथील ओमसाई अपार्टमेंटमध्ये काही वर्षांपासून बाळेफडी दाम्पत्य हे वास्तव्यास आहेत. पती स्मितेश बाळेफडी (वय 37) हे सेवानिवृत्त सैन्य अधिकारी आहेत. त्यांची पत्नी माधुरी रुग्णालयात परिचारिका आहे. स्मितेश यांना दारूचे वेसन आहे. ते तंबाखू खाऊन घरात थुंकल्याने पती-पत्नीमध्ये बुधवारी (7 एप्रिल) रात्री एक वाजता वाद झाला. पत्नीने थुंकण्यास मनाई केल्याने राग अनावर झालेल्या स्मितेश बाळेफडीने बंदुकीने पत्नीवर गोळी झाडली. तर पत्नीने गोळीला हुलकावणी देत स्थानिक लोकांच्या मदतीने पोलीस ठाणे गाठून पोलिसात तक्रार केली (Man shoots on his wife in New Mumbai).
पाच वर्षांपूर्वी लग्न जुळलं
स्मितेश आणि माधुरी यांचे लग्न मेट्रोमोनिअल वेबसाईटच्या माध्यमातून झाले होते. त्यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली आहेत. स्मितेशला दारूच्या वेसन असल्याने रोज घरी भांडण होत असे. लग्नापूर्वी दोघे घटस्पोटीत असल्याचे सांगण्यात येत आहे. फिर्यादी पत्नीच्या म्हणण्यानुसार रबाळे पोलीस स्टेशनमध्ये सेवानिवृत्त सैन्य अधिकारी स्मितेश बाळेफडी यांच्या विरोधात तक्रार नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच बाळेफडी यांच्याकडे बंदुकीचा परवाना आहे का नाही? त्यांच्याकडे बंदूक कुठून आली? याचा तपास सुरु असल्याचे रबाळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गोरे यांनी सांगितले.
हेही वाचा : डोंगरीत बसून ड्रग्जचा धंदा, विरोधात जाणाऱ्यांवर हल्ला, मुंबईतील लेडी डॉन अखेर एनसीबीच्या जाळ्यात !