लखनऊ : केंद्रीय राज्यमंत्र्याच्या घरात एका व्यक्तीची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कौशल किशोर हे उत्तर प्रदेशच्या मोहनलाल गंज जागेवरुन लोकसभा खासदार आहेत. त्यांच्या लखनऊ येथील निवासस्थानी एका युवकाची हत्या करण्यात आली. मृत युवकाची ओळख पटवण्यात आली असून त्याच नाव विनय श्रीवास्तव आहे. विनय हा कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोरचा मित्र आहे. तो घरी त्यांच्यासोबतच रहायचा. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक पिस्तुल जप्त केली आहे. या पिस्तुलच लायसन्स आहे. पोलिसांनी मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरु केला आहे. केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांचं बेगरिया गावात घर आहे. ठाकूरगंज पोलीस ठाणे क्षेत्रात हे गाव येतं. बेगरियामधील गावात कौशल किशोर यांच्या घरात ही घटना घडली आहे.
विनय श्रीवास्तवची गोळी झाडून हत्या करण्यात आली. पश्चिमचे डीसीपी राहुल राज, ADCP चिरंजीव नाथ सिन्हा यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालय. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केलीय. लखनऊ DCP पश्चिमी राहुल राज यांनी सांगितलं की, गोळी लागल्यामुळे विनय श्रीवास्तवचा मृत्यू झाला. त्याच्या डोक्यावरही जखम होती. रात्री 6 लोक आले होते. घरी खाणं-पिणं झालं. त्यानंतर गोळी झाडण्याची घटना घडली. ही पिस्तुल विकास किशोरची असल्याच म्हटलं जातय. घटनास्थळी फॉरेन्सिक टीम तपास करतेय. त्याशिवाय सीसीटीव्ही फुटजेही तपासल जातय. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झालाय.
कौशल किशोर यांनी काय सांगितलं?
मंत्री आणि खासदार कौशल किशोर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला या घटनेबद्दल समजल्यानंतर मी पोलीस आयुक्तांना फोन करुन या बद्दल कळवलं. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही पीडित कुटुंबासोबत आहोत. पोलीस आपलं काम करतील. घटनास्थळी मुलगा हजर नव्हता. त्याची पिस्तुल मिळाली आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत” असं कौशल किशोर यांनी सांगितलं.
कौशल किशोर यांच्यावर आधी काय आरोप झालेला?
2021 मध्ये भाजपा खासदार कौशल किशोर यांची सून अंकिताच्या वडिलांनी आरोप केला होता. मुलीच कोर्टाच्या आवारातून अपहरण केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी सुद्धा कौशल किशोर यांनी आरोप फेटाळून लावले होते. मुलगा आयुष सोबत अंकिता राहत असल्याच त्यांनी सांगितलं होतं. सूनेचे वडिल आशिष सिंह यांनी प्रतिमा मलीन करण्यासाठी असा आरोप केला असं ते म्हणाले होते.