Malegaon: मध्यरात्री रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे; दंगल पू्र्वनियोजित असल्याचा आमदार मुफ्तींचा दावा

| Updated on: Nov 17, 2021 | 10:37 AM

आमदार मौलाना मुफ्ती म्हणाले की, दंगलीप्रकरणी अटक केलेला एक नगरसेवक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. एक संशयित नगरसेवक जनता दलाचा असून, तो सध्या फरार आहे.

Malegaon: मध्यरात्री रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे; दंगल पू्र्वनियोजित असल्याचा आमदार मुफ्तींचा दावा
crime
Follow us on

नाशिकः त्रिपुरा येथील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढून मालेगावमध्ये असंतोष निर्माण करणाऱ्या रझा अकादमीच्या कार्यालयावर अखेर पोलिसांनी मध्यरात्री छापेमारी केली. मालेगावमध्ये रझा अकादमी आणि ऑल इंडिया सुन्नी जमियत उलमाने बंद पुकारला. रॅली काढली. त्यानंतर हिंसाचार उसळला. त्यात अनेक दुकानांची राखरांगोळी करण्यात आली. लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. याप्रकरणी आयोजकांवर फक्त गुन्हा दाखल झाला होता. पुढची कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नव्हती. पोलिसांच्या या भूमिकेवर स्वतः आमदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे उशिरा का होईना रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे टाकून कारवाई करण्यात आली.

संशयित 42 वर, सूत्रधाराचा शोध 

मालेगावमध्ये झालेला हिंसाचार हा सुनियोजित होता, असे पुढे येत आहे. नगरसेवक अयाज हलचलने एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात त्रिपुरा येथे मुस्लिम नागरिकांवर अन्याय होत आहे. तिथले दंगे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असे म्हणत ती क्लिप इतर चौघांच्या मदतीने वेगवेगळ्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. 8 नोव्हेंबरला हा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी नगरसेवक अयाज हलचलला बेड्या ठोकल्या असून, इतर 42 जणांवर कारवाई केली आहे. दंगलीच्या सूत्रधाराचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

आमदार मुफ्तींचे गंभीर आरोप

मालेगावमध्ये दंगलीप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली आहे. ते म्हणाले मालेगावमध्ये दंगल घडवून आणण्याचा काही समाजकंटकांचा कट होता. मात्र, मालेगावच्या नागरिकांनी तो उधळून लावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी याप्रकरणी भाजपवर आरोप केले आहेत. त्यालाही आमदार मौलाना मुफ्ती यांनी दुजोरा दिला. शिवाय आठ दिवसांपू्रवी नगरसेवक अयुब हलचलने त्रिपुरा घटनेबाबत बैठक घेतली. भडकावू भाषण केले. मात्र, याची पोलिसांनी दखल घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

रझा अकादमीच्या लोकांना पैसे वाटले

आमदार मौलाना मुफ्ती म्हणाले की, दंगलीप्रकरणी अटक केलेला एक नगरसेवक हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. एक संशयित नगरसेवक जनता दलाचा असून, तो सध्या फरार आहे. मुंबईतून रझा अकादमीच्या काही लोकांना पैसे वाटले. दंगलीच्या एकदिवस अगोदरच्या रात्री दंगेखोरांनी दगड आणून ठेवले होते. वीस वर्षांपासून मालेगाव शांत आहे. मात्र, काही जण ते मुद्दाम पेटवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

उपमहानिरीक्षकाकंडून पाहणी

मालेगाव दंगलीची नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी पाहणी केली. याप्रकरणी महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, त्यात 11 लाख 12 हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अनेक संशयित फरार असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

इतर बातम्याः

Pawar’s friendship: शरदाच्या दारात तारुण्याचे सदाबहार तोरण, हिरव्यागार दोस्तांचा बहारदार मळा अन् फुलांचे गाव!

साई भक्तांना शिर्डीत ऑनलाइन पासची सक्ती, 10 वर्षांखालील मुलांना दर्शन मनाई, भाविकांमध्ये रोष!