आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालणार आहे. एसआयटीने हा मोक्का लावला असून त्यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतो आहे. पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने एसआयटी आणि सीआयडीकडे दिला आहे. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत. सध्या राज्यात बीडमधील या हत्याकांडावरुन राजकारण तापलं आहे.
मोक्का हा कठोर कायदा आहे. संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी हा कायदा बनवण्यात आला आहे. आरोपीवर एकदा का मोक्का लागला की त्याला सहज जामिन मिळत नाही, म्हणजे तुरुंगातून बाहेर पडता येत नाही. विशेष म्हणजे मोक्का लागलेल्या आरोपींचा खटला विशेष न्यायालयात चालवला जातो.
कोणावर लागतो मोक्का?
संघटित स्वरुपाची गुन्हेगारी असेल तर मोक्का लागतो. एका व्यक्तीवर मोक्का लागत नाही. मोक्का लावताना गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेतली जाते. गुन्ह्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजेच टोळी असेल तर मोक्का लागतो. अपहरण, खंडणी, हत्या, अमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का लावला जातो. मोक्काच्या कलम 3 (1) नुसार आरोपींना किमान 5 वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते. यात आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची देखील तरतूद आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. कारण वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे.