नवी मुंबई : बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नवी मुंबईच्या उलवे येथे घडली आहे. नराधम बापाने आपल्या पोटच्याच अवघ्या तेरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला कोर्टाने 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संबंधित आरोपीचं नाव अरुण हंकारे असल्याची माहिती समोर आली आहे (Molestation of girl by father in New Mumbai).
नेमकं प्रकरण काय?
आरोपीच्या पत्नीचं बारा वर्षांपूर्वी निधन झालं. आरोपीला तीन मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा कामानिमित्त ठाणे येथे राहतो. तर आरोपी मुलींसोबत नवी मुंबईतील उलवे येथे राहतो. पीडित मुलगी हॉलमध्ये एकटी बसली असताना आरोपीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्यावेळी पीडिता ओरडू लागल्याने त्याने तिला सोडून दिले. पण कोणाला हा प्रकार सांगितल्यास ठार मारेन, अशी धमकी दिली (Molestation of girl by father in New Mumbai).
पीडितेच्या सहनशीलतेचा बांध फुटला
त्यानंतरही तीन ते चार वेळा हा प्रकार घडल्याने पीडिता भयानक संतापली. 15 मार्चला सकाळच्यावेळी पुन्हा हा प्रकार घडल्याने पीडितेचा बांध फुटला आणि तिने शिविगाळ करत विरोध केला. हे ऐकून किचनमधील पीडिताच्या बहिणी बाहेर आल्या. त्यांनी विचारपूस केली असता त्यांना हकीकत समजली.
नराधम बापाकडून मारहाण
हा भयानक प्रकार कानावर पडूनसुद्धा तिच्या बहिणी गप्प राहिल्याने तिने पोलिसांकडे जाऊन तक्रार करणार असल्याची धमकी आरोपीला दिली. त्यावर मात्र आरोपीने घरातील लाकडी बांबूने पीडितेला जबर मारहाण केली. त्यामुळे 21 मार्चला पिडिताने घरातून पळ काढला. पण त्या तेरा वर्षाच्या जीवाला काय करावे हे काही कळले नाही. ती नेरुळ रेल्वे स्टेशन परिसरात थांबून राहू लागली.
बापाची पोलीस ठाण्यात धाव
आरोपी बापाने मुलगी हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी मुलीकडे मोबाईल असल्याने तिला मोबाईलवरून संपर्क केला. तर ती नेरुळ रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावर पोलिसांनी तिला फोनवर व्यस्त ठेवत नेरुळ रेल्वे स्टेशन गाठले आणि पीडित मुलीला ताब्यात घेतले.
पीडितेने सर्व गैरप्रकार पोलिसांना सांगितला
बाल वयात घडलेला प्रकार आणि झालेल्या मारहाणीमुळे भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडितेला पोलीस सानपाडा येथील वात्सल्य ट्रस्टमध्ये घेऊन गेले. ठाणे महिला आयोग कार्यालयातील समुपदेशक अधिकाऱ्यांनी पीडितेला विश्वासात घेऊन समुपदेशन केले असता घडलेला सर्व प्रकार पीडितेने सांगितला. यावर पीडित मुलीच्या नराधम बापाला एनआरआय पोलिसांनी ताब्यात घेऊन कोठडीत ठेवले आहे. पुढील तपास एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील करत आहेत.